Thu, Apr 25, 2019 11:21होमपेज › Bhumiputra › शेतजमिनीतील आर्द्रतेचे व्यवस्थापन

शेतजमिनीतील आर्द्रतेचे व्यवस्थापन

Published On: Aug 07 2018 1:04AM | Last Updated: Aug 06 2018 8:07PMअरविंद जोशी

पावसाचे आणि भूगर्भातील पाण्याचे प्रमाण घटत चालले असताना शेतीसाठी पाणीव्यवस्थापन ही महत्त्वाची गरज ठरते. योग्य पिकांच्या निवडीपासून जलसंधारणासाठी योजलेल्या विविध उपायांपर्यंत अनेक मार्गांनी जमिनीच्या आर्द्रतेचे व्यवस्थापन करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड करणे, पिकांमध्ये बदल करणे, तणांचा नायनाट करणे, मातीची धूप रोखणे अशा उपायांबरोबरच लेसर समतलीकरण आणि ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला द्यायला हवी. 

शेतीच्या कामांसाठी मातीत गरजेप्रमाणे ओल असणे आवश्यक असते. शेताच्या नांगरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंत मातीत विशिष्ट आर्द्रता असायला हवी. शेतात कोणते काम सुरू आहे आणि मातीचा प्रकार कोणता आहे, यावरून आवश्यक आर्द्रतेचे प्रमाण ठरते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पिकांसाठीही जमिनीतील ओलाव्याचे आवश्यक प्रमाण वेगवेगळे असते. भाताच्या पिकासाठी अधिक ओलावा लागतो, तर बाजरीच्या पिकासाठी कमी ओलावा लागतो. आर्द्र जमिनीतच रोपांची मुळे फैलावत असल्यामुळे आणि या आर्द्रतेच्या साह्यानेच रोपे जमिनीतून अन्‍नद्रव्ये घेत असल्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जमिनीतील ओलावा आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जमिनीतील जिवाणू, जमिनीतील पाणी आणि हवेच्या विशिष्ट प्रमाणातील मिश्रणातच वाढू शकतात. त्यातूनच रोपांचे अन्‍न तयार होते. पठारी प्रदेशातील सिंचनक्षमता खूपच कमी आहे. खरिपाच्या हंगामात केवळ सात टक्के जमिनीलाच सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. रब्बीत तर अवघ्या तीन टक्के जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. सिंचनासाठी उपलब्ध स्रोतांचा या भागात जर योग्य आणि पूर्ण क्षमतेने वापर केला, तर सिंचित क्षेत्राची मर्यादा 15 टक्क्यांपर्यंत वाढविणे शक्य आहे. 

पठारी प्रदेशातील जमीन ओबडधोबड असते. मातीची खोलीही कमी असते. अशा प्रदेशात 1000 ते 1500 मिलीमीटर पाऊस पडतो. यातील ऐंशी टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. मातीची खोली कमी असल्यामुळे तसेच जमीन ओबडधोबड असल्याने बर्‍याच प्रमाणात पाणी वाहून जाते. त्याबरोबरच सुपीक मातीही वाहून जाते. त्यामुळेच पठारी प्रदेशात जमिनीचा ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शेताच्या पृष्ठभागावरून होणारी मातीची धूप रोखण्यासाठी चारही बाजूंना मजबूत बांध बनवावेत.

शेताच्या वरच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी एक वाट तयार करावी. हा मार्ग शेताच्या कडेने नदी-नाल्यांना मिळू शकेल, अशी व्यवस्था करावी. त्यामुळे मातीची धूप रोखता येईल. मोठे शेतकरी अशा उपाययोजना स्वतःच्या जोरावर करू शकतात, तर लहान शेतकरी सोसायटी किंवा सरकारच्या मदतीने ती करू शकतात. या उपाययोजनांमुळे मातीच्या तळापर्यंत पावसाचे पाणी शोषून घेतले जाते आणि गरजेप्रमाणे पिकांना ओलावा मिळतो. पावसाचे पाणी शेतात खोलवर साठून राहण्यासाठी योग्य अवजारांचा वापर मशागतीवेळी करणे गरजेचे आहे. प्रतिहेक्टर दहा ते वीस टन शेणखताचा वापर केल्यास मातीची पाणी धारणक्षमता वाढते. त्याचप्रमाणे शेतात पाणी एकाच ठिकाणी साचून राहत नाही. जैविक खतांच्या सातत्यपूर्ण वापरामुळे जमिनीच्या वरचा थर कडक बनत नाही आणि जमिनीच्या आतील भागातून पाण्याचे वहन योग्य प्रकारे होते. 

पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी शेततळ्याची निर्मिती करणे फायद्याचे ठरते. जमिनीच्या नैसर्गिक रचनेत थोडाफार बदल करून तलावाचे रूप देणे शक्य असेल, तर अशा ठिकाणी तळे तयार करावे. त्याचप्रमाणे जेथून कमीत कमी खर्चात संपूर्ण शेताला पाणी देता येईल, अशा ठिकाणी तळे बांधावे. सहकारी सोसायट्या किंवा सरकारी योजनेतून शेततळ्यांची निर्मिती करणे शक्य आहे. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच शेततळ्याचे काम करावे. काही अन्य उपायांद्वारेही पावसाच्या पाण्याचा संचय करणे शक्य आहे. पिकाच्या दोन ओळींच्या मध्ये खोल नाले तयार करून तेथे पावसाचे पाणी साचू दिल्यास पिकांना गरजेप्रमाणे ओलावा मिळत राहतो.

फळबागेसाठी पाणी साठविताना दोन फळझाडांच्या मध्ये खोल खड्डे करून त्यातही पाणी साठविता येते. या खड्ड्यांमधील पाण्यामुळे आजूबाजूच्या झाडांना गरजेप्रमाणे जमिनीचा ओलावा मिळत राहतो. त्याचप्रमाणे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेता येते. मातीच्या आत खोलवर मुळे रुजतील अशा प्रजातींचे वाण निवडण्याचाही पर्याय शेतकर्‍यांपुढे खुला आहे. दुष्काळी भागात अशा प्रजातींची लागवड करावी, जी रोपे जास्तीत जास्त ओलावा टिकवून ठेवतील आणि बाष्पीभवनाच्या माध्यमातून जमिनीतील कमीत कमी पाणी हवेत जाऊ देतील. अशा ठिकाणी अरुंद पाने असलेल्या प्रजातींची निवड करायला हवी. अशा पिकांची मुळे जमिनीत अधिक खोलवर जातात. त्याचप्रमाणे जमिनीतील तण कायम काढायला हवेत, जेणेकरून मातीचा जास्तीत जास्त ओलावा पिकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. 

जमिनीच्या समतलीकरणाचा पर्यायही जमिनीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र, समतल चर तयार करताना ट्रॅक्टर चालकाचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. ट्रॅक्टरचालकाकडे कौशल्याचा अभाव असेल तर समतलीकरण प्रभावी ठरत नाही, असा अनुभव आहे.

त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकर्‍यांनी लेसरद्वारे समतलीकरण करावे. या पद्धतीत ट्रॅक्टरचालकाच्या नैपुण्याला फारसे महत्त्व नसते. लेसरद्वारेच समतलीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. लेसरद्वारे समतलीकरण केल्यास भाताच्या शेतात दहा टक्के तर गव्हाच्या शेतात दहा ते वीस टक्के पाण्याची बचत करता येते, असे संशोधनांती सिद्ध झाले आहे. गव्हाच्या शेतीत तर पाण्याच्या बचतीबरोबरच 10 ते 15 टक्के उत्पादनही वाढते. त्यामुळे लेसरद्वारे समतलीकरण केल्यास उत्पादकता वाढते, असे म्हटल्यास ती अतिशयोक्‍ती ठरत नाही. त्याचप्रमाणे पिकांमध्ये सातत्याने बदल करणेही जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी अत्यावश्यक आहे. सामान्यतः भात आणि गव्हाच्या पिकात बदल करण्यास शेतकरी राजी नसतात.

कारण ही जास्त उत्पन्‍न देणारी पिके आहेत. काही शेतकरी तर एकाच वर्षात भाताचे दोनदा पीक घेण्याचाही प्रयत्न करतात. परंतु, पिकांमध्ये परिवर्तन केल्याव्यतिरिक्‍त उत्पादकता टिकवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे सातत्याने भात किंवा गव्हाचे पीक घेण्याऐवजी मधूनच भाज्या पिकविणे शेतीच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने चांगले ठरते. पिकात बदल करण्याबरोबरच आधुनिक सिंचन सुविधांचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती यासाठी फायदेशीर ठरते. शासनाकडून ठिबक सिंचनासाठी अनुदानही मिळते. ठिबक सिंचन पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शुष्क किंवा निमशुष्क जमिनीतही कमीत कमी पाण्यात भरघोस पीक घेता येते. अशा भागात भूगर्भातील पाणी खारे असते. तेही पिकासाठी उपयुक्त ठरू शकते. 

भूगर्भजल पुनर्भरण हा शब्दही जमिनीचा ओलावा टिकवून धरण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. यापुढील काळात पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे. आपण भीषण पाणीसंकटाच्या उंबरठ्याशी उभे आहोत, असा इशारा नीती आयोगानेही दिला आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाण्याचे जतन आणि संवर्धन करणे शेतकर्‍यांच्या दीर्घकालीन फायद्याचे ठरणार आहे. जुन्या तलावांची फेरखुदाई, पावसाचे वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविण्यासाठी विविध उपाय, रेनवॉटर हार्वेस्टिंग अशा उपायांनी आपण भूगर्भातील पाणीपातळी टिकवून ठेवू शकतो. सिंचनासाठी मोठ्या स्रोतांकडे न पाहता सूक्ष्म सिंचनाकडे वळणेही आता आवश्यक ठरले आहे. समतल चर, छोटे बंधारे, बांधबंदिस्ती अशा अनेक उपायांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी आपण अडवू शकतो आणि जमिनीत ते मुरवून बारमाही उपयोगासाठी पाणी उपलब्ध करू शकतो. जमिनीचा ओलावा शेतीच्या द‍ृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी प्राथमिक गरज आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहून शेतकर्‍यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करायला शिकले पाहिजे.