Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › येडियुराप्पा आता नवे ‘स्वामी’!

येडियुराप्पा आता नवे ‘स्वामी’!

Published On: Jul 24 2019 1:39AM | Last Updated: Jul 24 2019 8:46AM
बंगळूर : प्रतिनिधी

दोन आठवड्यांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय पेचाची आज अखेर झाली. मंगळवारी संध्याकाळी विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान झाले. त्यात कुमारस्वामी सरकारला 4 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. सभागृहात उपस्थित 204 आमदारांपैकी कुमारस्वामींना आपले सरकार टिकवण्यासाठी 103 मते पडण्याची गरज होती; पण त्यांना काँग्रेस-निजद आघाडीची 99 मते मिळाल्याने विश्‍वासदर्शक ठराव 4 मतांनी फेटाळला गेला. भाजपच्या सार्‍या 105 आमदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. बसपचा एक आमदार तटस्थ राहिला. त्याला बसपमधून बडतर्फ करण्यात येणार आहे. कुमारस्वामींच्या पराभवानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवाारी होण्याची शक्यता आहे. 

चौदा महिन्यांच्या सरकारला 20 आमदारांची बंडखोरी भोवली आणि आज कुमारस्वामी यांचे सरकार गडगडले. सोमवारी सकाळी अधिवेशनाला सुरवात झाली. त्यावेळी विधानसभेत भाजपचे सर्व 105 आमदार उपस्थित होते. पण, काँग्रेसचे दोनच आमदार उपस्थित होते. त्यामुळे आमदारांनी  सभाध्यक्षांना पंधरा मिनिटांचा अवधी मागून घेतला. दुपारी 12 वाजता पुन्हा सभागृह सुरू झाले. त्यावेळी पुन्हा विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली. भाजपने विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची सातत्याने मागणी केली. तरी, काँग्रेस व निजदकडून चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच होते. त्यामुळे सभाध्यक्ष रमेश कुमार यांनी आजच विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान होईल. सहा वाजता मतदान घेण्यात येण्यात येईल, असे सांगून दुपारपर्यंत सभागृह तहकूब केले.

न्यायालयाच्या इशार्‍यानंतर फिरली चक्रे

विश्‍वासदर्शक ठरावाबाबत अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने अपक्ष आमदार, सभाध्यक्ष आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन मंगळवार संध्याकाळपर्यंत विश्‍वासदर्शक ठरावावर सभागृहात सकारात्मक चर्चा होऊन निर्णय होण्याची आशा आहे.

बुधवारपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकत आहे, असे सांगत विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान झाले नाही तर, बुधवारी हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला होता. न्यायालयाच्या या इशार्‍यामुळेच सभापती रमेश कुमार यांनी सहा वाजता विश्‍वास दर्शक ठरावावर आवाजी मतदान घेतले. त्यामध्ये भाजपने बाजी मारली.

अशी झाली प्रक्रिया

सभापती रमेश कुमार  सहा वाजता सभागृहात आले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी, बहुमत सिध्द करण्यास सरकारला सांगावे, अशी विनंती त्यांना केली. सभापतींनी सूचना केल्यानुसार प्रत्येक आमदाराने आवाजी मतदान केले. सभागृहात 204 आमदार उपस्थित होते. 103 आकडा बहुमत सिध्द करण्यासाठी आवश्यक होता. त्यामध्ये काँग्रेस?निजद आघाडीला 99 मते मिळाली. तर भाजपला 105 मते मिळाली. त्यामुळे भाजपने विजय संपादन केला.               

कुमारस्वामींचा राजीनामा

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना विश्‍वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला. त्यानंतर सभागृहात परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सभापती रमेश कुमार यांना दिली. त्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब केले.

तरीही बंडखोरी का?

सरकारने सर्व आमदारांना किमान शंभर कोटी रूपयांचा निधी दिला आहे. बंडखोरांपैकी सात जणांच्या मतदारसंघात 300 कोटींचा निधी मंजूर आहे. असे असतानाही सरकारविरोधात बंडखोरी करून सरकार विकास कामे राबवत नाही, असा प्रचार करण्यात आला, असा अरोप एच. डी. कुमारस्वामी यांनी सभागृहात केला. सभागृहात त्यांनी अनेक भावनिक मुद्द्यांवर दोन तासाहून अधिक काळ भाषण केले.

भाजपची विजयी खूण

मतदान प्रक्रियेत भाजपने विजय मिळवल्यामुळे सभागृह तहकूब झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सभागृहात विजयी खूण दाखवत आनंद व्यक्‍त केला. दोन आठवडे विश्‍वासदर्शक ठरावावर भाजपने सभागृहात ाक्रमक भूमिका घेतली नव्हती. आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ नये, याची खबरदारी बाळगण्यात आली होती. अखेर भाजपने पाळलेला संयम त्यांनाा विजयपथापर्यंत घेऊन गेला.

तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री

राज्यपाल वजुभाई वाला यांनी एच. डी. कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांनी नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्याची विनंती कुमारस्वामींना केली. त्यामुळे भाजप सरकार स्थापन होईपर्यंत कुमारस्वामी काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. पण, त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.

चौदा महिने सुरळीत चाललेल्या काँग्रेस?निजद सरकारच्या पाडावासाठी भाजपला मोठा घोडेबाजार करावा लागला. ऑपरेशन कमळव्दारे त्यांनी ही सत्ता मिळवली आहे. पण, आम्ही भाजपचे पितळ उघडे पाडू.
-डॉॅ. जी. परमेश्‍वर
 

बंडखोर आज बंगळुरात

दोन आठवडे मुंबईतील हॉटेलमध्ये राहून सरकारला तारेवरची कसरत करायला लावलेले काँग्रेस?निजदचे बंडखोर 15 आमदार बुधवारी बंगळुरात येणार असल्याचे समजते. सरकारने विश्‍वासदर्शक ठरावात बहुमत गमावल्यामुळे ते माघारी परतणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपची आज बैठक

विश्‍वासदर्शक ठरावात भाजपने बहुमत सिद्ध केल्यामुळे आता सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ समितीची बैठक बुधवारी (दि. 24 ) होणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.

मोदी, शहांशी आज चर्चा करणार

सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी पत्रकारांना दिली.
 

येडिंचा शपथविधी उद्या?

काँग्रेस?निजद सरकार कोसळल्यामुळे भाजप बुधवारी सत्ता स्थापनेचा दावा करणार असून गुरुवारी (दि. 25) भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चौदा महिन्यांनंतर पुन्हा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील; तर बंगळूर पोलिस आयुक्‍त आलोक कुमार यांनी शहरात दोन दिवस जमावबंदी जारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी बाळगण्यात आली आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून बेळगावातही वाजले फटाके

बेळगाव : राज्यातील निजद-काँगे्रस सरकार गडगडल्यानंतर बेळगावात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. भाजप पदाधिकार्‍यांतर्फे अधिकृत विजयोत्सव बुधवारी सकाळी 11 वा. साजरा करण्यात येणार आहे.

तीन दिवसांपासून सरकारचे काय होणार, याबाबत सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता होती. आज-उद्या बहुमत सिद्ध होणार, याचीच सर्वत्र चर्चा होती. अखेर मंगळवारी रात्री 8 वा. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजप सत्तेवर येण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे बेळगाव शहरात विविध ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्‍त केला; तर भाजपचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन बुधवारी सकाळी 11 वा. चन्‍नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरात पूजन करून भाजपचे नेते बी. एस. येडियुराप्पा यांना शुभेच्छा देण्यात येणार असल्याची माहिती शहर भाजपचे पदाधिकारी राजेंद्र हरकुणी यांनी दिली.