Thu, Dec 05, 2019 20:44होमपेज › Belgaon › सोनट्टीत वृद्धाकडून सुनेचा खून 

सोनट्टीत वृद्धाकडून सुनेचा खून 

Published On: Jul 10 2019 1:37AM | Last Updated: Jul 10 2019 12:00AM
बेळगाव : प्रतिनिधी 

सोनट्टी (ता. बेळगाव) येथे महिलेचा सासर्‍याने खून केला. मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. कलावती सिद्रायी मुचंडी (वय 32, रा. सोनट्टी, ता. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. तिेचा सासरा सत्याप्पा लक्ष्मण मुचंडी (60, रा. सोनट्टी) याला काकती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सत्याप्पा याला त्याच्या सुनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.  मंगळवारी सायंकाळी घरात कोणी तरी आल्याचा संशय सत्याप्पाला आला. त्याने सुनेकडे विचारणा केली. तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोघांत भांडण सुरू झाले.  चिडलेल्या सत्याप्पाने बाजूचा विळा घेऊन कलावतीच्या मानेवर वार केला. यामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला जिल्हा रुग्णालयाकडे आणत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेचा पती सेंट्रिंगचे काम करतो. दहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून, त्यांना दोन मुले आहेत. ही घटना घडली, तेव्हा पती कामावर होता. मृत महिलेची आई निलव्वा दामोदर नाईक (रा. गांधीनगर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सत्याप्पाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.