Thu, Dec 12, 2019 22:26होमपेज › Belgaon › दुष्काळी जनतेचा घसा कोरडाच

दुष्काळी जनतेचा घसा कोरडाच

Published On: Jun 05 2019 1:27AM | Last Updated: Jun 04 2019 8:15PM
बेळगाव : अंजर अथणीकर

प्रशासन  आणि  लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे हिडकल धरणातील दुष्काळग्रस्तांना सोडलेल्या पाण्याची चोरी झाल्याने कागवाड, अथणी तालुक्यातील जनतेचा घसा मात्र कोरडाच राहिला आहे.  आता जनतेला पावसावरच अवलंबून राहावे लागणार असून, कोयनेतून येणारे पाणीही आता हवेत विरण्याचीच चिन्हे अधिक आहेत. 

प्रत्येक वर्षी मार्च ते मे दरम्यान महाराष्ट्र शासन कोयना धरणातून कृष्णा नदीत दोन ते चार टीएमसी पाणी सोडत असते. या बदल्यात कर्नाटक शासन त्याचे बिल देत असते.  यावर्षी दुष्काळाने भीषण रुप धारण केले असताना ऐनवेळी महाराष्ट्र शासनाने हात आखडता घेत पाणी सोडले नाही. याचा सर्वाधिक फटका बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्याला बसला. यामुळे सध्या आठशेहून अधिक टँकरने या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा सुरु आहे. यावर कर्नाटक शासनाने रोज लाखो रुपये खर्च होत आहेत. 

थेट कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे कागवाड आणि अथणी तालुक्याला तर सर्वाधिक झळ बसली आहे. गेले तीन महिने कृष्णा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. या तालुक्यांना महाराष्ट्रातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सर्व नळ पाणी पुरवठा योजना कृष्णा नदीवर अवलंबून असल्यामुळे आणि नदीमध्ये पाणीच नसल्याने नागरिकांची दाही दिशा भटकंती सुरु झाली आहे.

कोयनेची पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये करार होण्याची गरज आहे. याला विलंब लागणार असल्यामुळे कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी तात्पुरते हिडकल धरणातून पाणी उगार (ता. कागवाड) येथे कृष्णा नदीत पाणी सोडण्यास शासनाकडून परवानगी मिळवली. त्यानुसार हिडकल धरणातून 20 मे रोजी हजार क्यसेकप्रमाणे एक टीएमसी पाणी सोडण्यात आले.

हिडकल धरणातून सोडलेले पाणी सुमारे 94 कि. मी. प्रवास करुन उगारजवळ पाच दिवसांत पोहोचेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. आता पंधरवडा उलटला तरी यातील एक थेंबही पाणी कृष्णा नदीत पोहोचले नाही. या पाण्याची मध्येच चोरी झाली. शेतकर्‍यांनी पिण्याचे पाणी शेती साठी वापरुन टाकले. अथणी, कागवाडची जनतेचा घसा मात्र कोरडाच राहिला. आता पुन्हा या जनतेकडून आंदोलने सुरु आहेत. मात्र पाणी देणार कोठून, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हिडकलमधून पाणी सोडले तेव्हा त्याच्या आजूबाजूचे शेतीपंपाचे कनेक्शन बंद करण्याची गरज होती. त्याचबरोबर डिझेल इंजिन वापरणार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे होते. त्याचबरोबर निदान पाणी पोहचेपर्यंत पाण्याला पोलिस संरक्षणाची गरज होती. यातील काहीही बाबी करण्यात आल्या नाहीत. काहीजणांनी कॅनॉल फोडून पाण्याची चोरी केली. 

पाणी पोहोचण्यासाठी उपाययोजना करा, असा शासनाकडून कोणताही आदेश जिल्हाधिकार्‍ंयांना आला नाही. यामुळे एक टीएमसी पाणी तसे वाया गेले आहे. हिडकल धरणात आता केवळ दीड टीएमसीहून कमी पाणी आहे. आता या धरणातून पाणी मिळणे अशक्य आहे. दुसर्‍या बाजूला कोयना धरणातही जवळपास 16 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रही पाणी सोडण्याची शक्यता कमी आहे. दुसर्‍या बाजूला पाण्यासाठी पाणी देण्याचा महाराष्ट्र - कर्नाटक शासनातील करार अजूनही झालेला नाही. यामुळे सध्यातरी सीमा भागातील जनतेला आता पावसाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हिडकल, कोयनेतून पाणी मिळणे अवघड

हिडकल धरणामध्ये आता दीडहून कमी टीएमसी पाणी साठा आहे. या पाण्याचा साठा अत्यावश्यमध्ये मोडतो. त्याचबरोबर कोयना धरणातही जवळपास सोळा टीएमसी पाणी साठा आहे. तोही आपत्कालीन  आहे. यामुळे या दोन्ही धरणातून आता पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या जनतेला आता काय उत्तर द्यायचे, असा प्रश्‍न लोकप्रतिनिधीसमोर उपस्थित झाला आहे.