Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › ‘त्याच्या’ किडण्या निकामी 

‘त्याच्या’ किडण्या निकामी 

Published On: Jun 25 2019 1:30AM | Last Updated: Jun 25 2019 1:30AM
बेळगाव : प्रतिनिधी

प्रेयसीच्या कुटुंबियांनी शारीरिक छळ करत विजेचा शॉक दिलेला तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या असून, तो सध्या डायलिसीसवर असल्याची माहिती डॉक्टरांचा हवाला देत पोलिस अधिकार्‍यांनी दिली. मडीवाळ अशोक रायबागकर (26) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हल्लेखोर कुटुंबिय व सोबत आलेले अन्य सदस्य काँग्रेसचे समर्थक असून, यामध्ये एका आमदाराचा पुत्रही असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. गरग (जि. धारवाड) येथील तरुणाचे गावातीलच एका तरुणीवर प्रेम होते. परंतु, हे प्रकरण तरुणीच्या घरच्यांना समजल्यानंतर सदर तरुणाला सज्जड दम देऊन गावातून हाकलून लावले होते. गेल्या सात महिन्यांपासून हा तरुण बेळगावातील गांधीनगर परिसरात राहतो.

परंतु, तो पुन्हा तरुणीच्या संपर्कात आल्याच्या संशयातून तरुणीच्या कुटुंबियांनी त्याचे शनिवारी अपहरण करून बेदम मारहाण केली. शिवाय शरीरावर ठिकठिकाणी विजेचे शॉक देऊन त्याचा अनन्वीत शारीरिक छळ केला. यामुळे या तरुणाच्या दोन्ही किडण्यांवर परिणाम झाला असून, त्यांचे कार्य बंद होत चालले आहे. यामुळे सध्या या तरुणाला डायलिसीसवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला मारहाण करणार्‍या सहा जणांविरोधात माळमारुती पोलिसांत खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे माळमारुतीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सांगितले. याला आता राजकीय वळण मिळत असून, हल्लेखोर काँग्रेस पक्षाशी संबंधित व आमदाराचे समर्थक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.