Sun, Dec 08, 2019 21:45होमपेज › Belgaon › देसूरजवळ सख्ख्या भावांच्या कारला अपघात, एक ठार

देसूरजवळ अपघात, एक ठार, एक जखमी

Published On: Jul 19 2019 2:08PM | Last Updated: Jul 19 2019 2:09PM
बेळगाव : प्रतिनिधी

बाजूने निघालेल्या वाहनाला ओव्हरटेक करून पूढे जाताना समोरुन येणार्‍या दुसर्‍या वाहनाची कारला धडक बसली. यामुळे कार रस्त्याकडेला कलंडली. यामध्ये दोघा सख्ख्या भावांपैकी कार चालक भाऊ जागीच ठार झाल्‍याची घटना घडली. अनंत रामचंद्र सूर्यवंशी (वय 62 रा. कंग्राळी रोड, शाहूनगर) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बेळगाव- खानापूर रोडवरील देसूर क्रॉस जवळ हा अपघात घडला. त्यांचे मोठे भाऊ अमरनाथ रामचंद्र सूर्यवंशी (वय 68) हे जखमी आहेत.

याबाबत वडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमरनाथ यांना अर्धांगवायूचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी खानापूरला घेऊन त्यांचे धाकटे भाऊ अनंत हे गेले होते. उपचार घेऊन परतताना देसूर क्रॉसजवळ समोरून अवजड वाहन निघाले होते. त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना अचानक समोर टिप्पर आली. त्याला चुकविण्याचा प्रयत्न करताना समोरील टिप्परच्या एका बाजूला कारची धडक बसली. यामुळे कार रस्त्याकडेला खड्ड्यात कलंडली. यावेळी कार चालक अनंत यांना छातीला जोराचा मार लागला, तसेच डोक्‍यालाही गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. बाजूला बसलेले त्यांचे मोठे भाऊ किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वडगावच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमी अमरनाथ यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त टिप्पर व चालकाला ताब्यात घेतले आहे. वडगाव पोलिस स्‍टेशनमध्ये अपघाताची नोंद झाली असून, उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर अधिक तपास करीत आहेत.