Thu, Dec 12, 2019 22:13होमपेज › Belgaon › तीन वर्षांच्या मुलाचा टाकीत बुडून मृत्यू

तीन वर्षांच्या मुलाचा टाकीत बुडून मृत्यू

Published On: Apr 15 2019 1:52AM | Last Updated: Apr 15 2019 12:05AM
खानापूर : प्रतिनिधी

पाण्याच्या टाकीत पडलेला चेंडू काढताना टाकीत पडल्याने समर्थ सोमनाथ जुंजवाडकर (वय 3, रा. होनकल, ता. खानापूर) या चिमुरड्याचा मृत्यू झाला. रामनवमीनिमित्त आयोजित पारायण सोहळ्याच्या महाप्रसादाची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. होनकल गाव शोकसागरात बुडाला आहे.

होनकल येथील राममंदिरात दोन दिवसांचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. शनिवारपासून सुरू झालेल्या उत्सवाची रविवारी दुपारी महाप्रसादाने सांगता होणार होती; मात्र रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. समर्थ आपल्या वडील व आजोबांसोबत मंदिराकडे गेला होता; पण सर्वांची नजर चुकवून तो पुन्हा घराकडे परतला. घरासमोर खेळत असताना त्याचा चेंडू पाण्याच्या टाकीत पडला. चेंडू काढण्यासाठी तो खाली वाकला असता तोल जाऊन तो टाकीत पडला आणि बुडाला.

काहीवेळानंतर घरच्यांनी समर्थ दिसत नसल्याचे पाहून शोधाशोध सुरू केली असता टाकीचे तोंड उघडे दिसले. टाकीत उतरुन पाहिल्यानंतर समर्थ बुडाल्याचे आढळले.  लागलीच त्याला खानापुरातील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रामनवमी उत्सवातच दुर्घटना घडल्याने उत्सवाची तयारी सोडून सारा गाव दवाखान्याच्या परिसरात गोळा झाला. समर्थची आई माहेरी मोदेकोप याठिकाणी गेली होती. तिला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील सोपस्कार पार पाडले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, आजी, आजोबा व दोन महिन्याचा भाऊ आहे.