Tue, Aug 20, 2019 08:22होमपेज › Belgaon › पिरनवाडी येथे तीन तोळे दागिने लंपास

पिरनवाडी येथे तीन तोळे दागिने लंपास

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 29 2019 12:17AM
बेळगाव : प्रतिनिधी

रात्री घर बंद करून पाहुण्यांकडे गेले असता चोरट्यांनी दरवाजा फोडून घरातील तीन तोळ्यांचे दागिने लांबविले. पिरनवाडी येथे रविवारी सकाळी नऊ वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. सचिन माने (रा. पिरनवाडी) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

सचिन माने हे आरोग्य खात्यात कर्मचारी आहेत. शनिवारी रात्री त्यांच्या नात्यात टिळकवाडीत समारंभ असल्याने ते कुटुंबीयासह रात्री 11 वाजता गेले होते. रविवारी सकाळी 9 वाजता जेव्हा ते घरी परतले तेव्हा समोरील दरवाजाचे लॉक तोडल्याचे आढळून आले. आत जाऊन पाहिले असता कपाटालाच असलेल्या चावीचा वापर करून चोरट्यांनी कपाटातील तीन तोळ्यांचे दागिने लांबविल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती वडगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी अधिक तपास करीत आहेत.