Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › शिमोगा राखले, बळ्ळारी गमविले

शिमोगा राखले, बळ्ळारी गमविले

Published On: Nov 07 2018 1:30AM | Last Updated: Nov 06 2018 7:28PMबेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक निकाल जाहीर झाला असून काँग्रेस-निजद आघाडीने चार तर भाजपला एक जागा मिळाली आहे. भाजपने शिमोगा राखले तरी बळ्ळारी लोकसभेची जागा गमवावी लागली आहे. यामुळे आघाडीची वाटचाल योग्य दिशेने झाली तरी या पराभवामुळे भाजपवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि निजदने आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर त्यानंतरच्या पोटनिवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर गुप्तचर खात्याने मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये आघाडीचा विजय निश्‍चित असल्याचे म्हटले होते. हे तंतोतंत खरे ठरले. शिमोग्यातील लोकसभेची जागा भाजपला मिळणार असल्याचेही सांगितले होते. 

रामनगर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार एल. चंद्रशेखर यांनी ऐनवेळी रिंगणातून बाहेर पडत असल्याचे सांगून आघाडीच्या उमेदवार अनिता कुमारस्वामी यांना पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी ही जागा आघाडीकडे गेली. जमखंडी विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार सिद्दू न्यामगौडा यांचे पुत्र आनंद यांनी विजय मिळविला. काही दिवसांपूर्वी सिद्दू यांचे अपघाती निधन झाले. गत निवडणुकीत भाजप उमेदवार श्रीकांत कुलकर्णी काही अंतराने पराभूत झाले होते. आनंद हे नवखे असल्याने कुलकर्णी यांचा विजय सोपा असल्याचे सांगितले जात होत. पण, वडिलांच्या अपघाताची सहानुभूती मिळाल्याने आनंद यांचा सुमारे 40 हजार मताधिक्याने विजय झाला.

लोकसभा पोटनिवडणुकीत बळ्ळारीमध्ये भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. श्रीरामुलू यांच्या भगिनी जे. शांता यांचा काँग्रेस उमेदवार उग्रप्पा यांनी सुमारे 2 लाख मतांच्या अंतराने पराभूत केल्याने पुन्हा एकदा बळ्ळारीत काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. अति आत्मविश्‍वासामुळे ही जागा भाजपला गमवावी लागल्याचा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.मंड्या येथे निजद उमेदवार शिवरामेगौडा यांचा वीस वर्षांचा राजकीय संन्यास संपला. गेल्या चार लोकसभा निवडणुकीत त्यांना सलग पराभूत व्हावे लागले होते. 

केवळ येडिपुत्र विजयी

शिमोगा येथे येडिपुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी आघाडीचे उमेदवार मधु बंगारप्पा यांचा पराभव केला. प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर येडियुराप्पा यांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले खरे. पण, त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आले. आता पोटनिवडणुकीतही त्यांना केवळ आपल्या मुलाला विजयी करता आल्याने लोकसभा निवडणुकीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे.