Sun, Dec 08, 2019 21:45होमपेज › Belgaon › लोकसभेच्या ‘शिवारा’त होतेय मनपाची ‘पेरणी’

लोकसभेच्या ‘शिवारा’त होतेय मनपाची ‘पेरणी’

Published On: Apr 19 2019 1:46AM | Last Updated: Apr 18 2019 10:08PM
शिवाजी शिंदे

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. प्रचार ऐन भरात असताना मताधिक्य मिळविण्यासाठी शहरात आगामी काळात होणार्‍या मनपा निवडणुकीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मताधिक्य देणार्‍या कार्यकर्त्याच्या गळ्यात नगरसेवकपदाच्या उमेदवारीची माळ घालण्याचे मधाचे बोट दाखविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या शिवारात मनपा निवडणुकीची पेरणी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक मनपा निवडणुकीच्या तोंडावर  होत आहे. याचा पुरेपूर फायदा राजकीय पक्षांकडून मताधिक्य मिळविण्यासाठी करण्यात येत आहे. नेत्यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे आमिष दाखवून इच्छुकांना कामाला लावले आहे. परिणामी, मनपाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे हौसे-नवशे घाम गाळत आहेत.

बेळगाव मनपाचा कार्यकाळ संपला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण इच्छुकांना लागली असून वेगवेगळ्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

बेळगाव मनपाच्या निवडणुका आजपर्यंत मराठी-कन्नड भाषिक मुद्दयावरच होत असतात. परंतु, यावेळी याला छेद जाण्याची शक्यता आहे. मनपा निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहेत. यामुळे भाजप, काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर म. ए. समितीने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार्‍यांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. याचे पडसाद मनपा निवडणुकीदरम्यान उमटणार आहेत.

सध्या मताधिक्य मिळविण्यासाठी इच्छुकांचा वापर करून घेण्यात येत आहे. मनपा उमेदवारीचे गाजर दाखविण्यात येत आहे. इच्छुकांच्या माध्यमातून मतांची बेरीज वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षांकडून शहरातील गल्लीबोळ मतासाठी पिंजून काढण्यात येत आहेत. यामध्ये आजीमाजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार इमानेइतबारे सहभागी होत असून त्यांच्याकडून मतदारांकडे मतांची याचना करण्यात येत आहे.