सदलगा : वार्ताहर
येथील एकसंबा रोडवरील बाजीराव प्लॉटमधील माजी सैनिक सखाराम रामचंद्र धनवडे यांचे घर रविवारी दुपारी भरदिवसा चोरट्यांनी फोडले. घरातील 21 तोळे सोने आणि रोख 6 हजार रुपये असा एकूण 6.50 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
याबाबत बोलताना सखाराम धनवडे म्हणाले, सुट्टी असल्याने आपण कुटुंबीयांसमवेत नृसिंहवाडी येथे दर्शनाला गेलो होतो. दुपारी 12 ते 3 दरम्यान घरी कोणी नव्हते. तीनच्या सुमारास घरी आल्यानंतर घरातल्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाची कडी उचकटलेली दिसून आली. घरातील कपाट आडवे पाडून दरवाजे फोडून आतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबविल्याचे धनवडे यांनी सांगितले. मात्र, चोरट्यांनी चांदीच्या वस्तूंना हात लावला नसल्याचे घटनास्थळावरून दिसत होते.
सततच्या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या धाडसी चोरीमुळे आणि हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असताना घडलेल्या या घटनेने शहर व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला तपासासाठी बोलावण्यात आले.यावेळी सीपीआय. बसवराज मुकर्तीहाळ, एएसपी मिथुनकुमार, उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, सुरेश इरगार, एल.एस.खोत, बीपी जरळी घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली. पंचनामा करून पुढील तपास सुरू असल्याचे कुंभार यांनी सांगितले.