Wed, Jun 26, 2019 15:43होमपेज › Belgaon › वैभवशाली शिवजयंती आजपासून

वैभवशाली शिवजयंती आजपासून

Published On: May 06 2019 1:49AM | Last Updated: May 06 2019 12:47AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या वैभवशाली परंपरेचा वारसा सांगणार्‍या शतक महोत्सवी शिवजयंती सोहळ्याला सोमवार, दि. 6 पासून सुरुवात होणार आहे. तीन दिवस हा सोहळा रंगणार असून 8 मे रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.

सोमवारी सकाळी सात वाजता धर्मवीर संभाजी चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे शिवज्योत आणण्यासाठी रायगड, प्रतापगड, शिवनेरी आदी ठिकाणी गेली आहेत. त्या ज्योतींचे स्वागत झाल्यानंतर नरगुंदकर भावे चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून पूजन होणार आहे.  मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे हा संपूर्ण कार्यक्रम होणार असून विविध युवक मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे आणि शिवभक्‍तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

8 मे रोजी सायंकाळी 6 वा. नरगुंदकर भावे चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक शहरातील विविध मार्गांवर फिरून कपिलेश्‍वर मंदिर येथे सांगता होणार आहे.

शहापूर विभाग महामंडळ

शहापूर विभाग मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे सोमवारी सकाळी 10 वाजता शहापूर येथील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.

वडगावात उद्या मिरवणूक

वडगाव येथील शिवजयंती उत्सव मंडळांची चित्ररथ मिरवणूक मंगळवार दि. 7 रोजी रात्री 8 वाजता निघणार आहे. तर 8 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. नाथ पै चौक येथून शहापूर, खासबाग, होसूर या भागातील मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शहापूर आणि वडगाव भागातील चित्ररथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवभक्‍तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे.

यंदाची शिवजयंती शताब्दी वर्षातील आहे. त्यामुळे लोकांत उत्साह आहे. हा सण सर्व बेळगावकरांचा असून सर्वांनी आनंदात आणि तितक्याच जल्‍लोषात साजरा करावा. शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर आम्ही विविध उपक्रम राबविणार आहोत.
दीपक दळवी, अध्यक्ष, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ