Sun, Dec 08, 2019 21:49होमपेज › Belgaon › ‘एसआयटी’कडून कसून चौकशी

गोंधळेकर, कळसकरला खानापूर परिसरात फिरवले

Published On: Sep 28 2018 1:15AM | Last Updated: Sep 27 2018 10:35PMबेळगाव : प्रतिनीधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’कडून कसून तपास सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधिकारी बेळगावात तळ ठोकून आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या संशयितांना खानापूर परिसरातील अनेक भागात फिरवले असून तपास केला आहे. 

शरद कळसकरने पिस्तूल प्रशिक्षण घेतलेले ठिकाण दाखविण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर तपासात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सुधन्वाला गुरुवारी  बेळगावात आणून तपास करण्यात आला. महाराष्ट्र एटीएसकडून अटक  करण्यात आलेल्या शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये साम्य आढळले.

चिखले परिसरात चौकशी

शरद कळसकरला दि. 25 रोजी बेळगावला आणण्यात आले होते. त्याची चौकशी करून उद्यमबाग परिसरासह खानापूर परिसरातील चिखले येथे पिस्तूल प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणाला नेण्यात आले होते. सुधन्वाने सदर प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणांची योग्य माहिती दिल्याचे एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एसआयटीचे तपास अधिकारी जे. सी. राजू यांच्या नेतृत्वाखाली तर सुधन्वाला एसआयटी तपास अधिकारी एम.आर हरीश यांच्या नेतृत्वामध्ये दि. 26 रोजी बेळगावात आणण्यात आले. 

धागेदोरे उलगडणार

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) बेळगावातील प्रकाश चित्रपटगृहाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाचाही तपास केला जाणार आहे. मुंबईतील नालासोपारा येथे अटक करण्यात आलेले संशयित शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे. 25 जानेवारी रोजी पद्मावत चित्रपट प्रकाश चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्या दिवशी रात्री 9.30 वा. काही अज्ञातांनी मोटारसायकलीवरून येऊन चित्रपटगृहाच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकला.

प्रत्यक्षदर्शींची माहिती

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आधी आगीचा गोळा आवारात पडला. त्यानंतर त्याचा स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नव्हती. त्याचवेळी मुंबईतील कल्याण येथील भानुसागर चित्रपटगृहाबाहेरही बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. 

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे छापा घालून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके जप्‍त केली होती. त्यावेळी शरद कळसकरच्या संगणकामध्ये बेळगावातील प्रकाश चित्रपटगृह आणि मुंबईतील भानुसागर चित्रपटगृहाचा उल्‍लेख आढळल्याने कर्नाटक एसआयटीकडून याचा तपास केला जाणार आहे. कळसकर आणि गोंधळेकर यांचा  यामागे हात असल्याचे पुरावे मिळाले असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.