Thu, Dec 12, 2019 22:15होमपेज › Belgaon › लोकभाषेचा तिढा, सीमाप्रश्‍नाचा लढा अधोरेखित

लोकभाषेचा तिढा, सीमाप्रश्‍नाचा लढा अधोरेखित

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:07PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव परिसरात  सीमालढ्याला समांतर अशी मराठीचा जागर करणारी साहित्य संमेलनांची चळवळ उभी करण्यात यशस्वी ठरलेले कडोली संमेलन रविवारी पार पडले. यामध्ये इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामध्ये बोलीभाषेचा निर्माण झालेला तिढा आणि सीमावासियांचा जीवन मरणाचा प्रश्‍न बनून राहिलेला सीमालढा अधोरेखित झाला.

कडोली संमेलन 33 वर्षापासून भरविण्यात येते. याकाळात संमेलनाने अनेक वळणे घेतली. साहित्यावर निखळ चर्चा व्हावी, भाषा, संस्कृतीचा जागर व्हावा, कथा-कवितांच्या ओळी कानावर पडाव्यात या तळमळीतून संमेलनाची सुरूवात झाली. त्याला तीन दशकांचा प्रदीर्घ काळ लोटला. 

या काळात संमेलनाने मूळ स्वरुप कायम ठेवत अनेक  बदल स्वीकारले. आमराईखाली जमणारी साहित्य रसिकांची मांदियाळी भव्य मंडपात जमत आहे. त्याठिकाणी साहित्यिक गप्पाटप्पात रंगत आहेत. त्या साहित्य आनंदात रसिक डुंबतात. याची प्रचिती रविवारी आली. संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्‍वर मुळे यांनी अनेक प्रश्‍नांच्या तळाशी जाऊन महत्त्वाचे मुद्दे मांडले. सीमाप्रश्‍नाचा उल्लेख करत हा परिसर महाराष्ट्राबाहेर आहे, असे आपल्याला कधीही जाणवले नसल्याचे सांगितले. भाषेच्या आधारावर 70 वर्षे लढा देणे हीच मुळात कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिकीकरणात बोलीभाषा झपाट्याने मृत्युपंथाला लागत आहेत. 14 दिवसात जगातील एक बोलीभाषा नामशेष होत असून हा झपाटा भयावह आहे. जगभरात निर्माण झालेले इंग्रजीचे आकर्षण बोलीभाषांना गिळंकृत असून प्रत्येकाने आपल्या भाषा समृद्ध करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. बोलीभाषा या ज्ञानभाषा झाल्या तरच तरतील, असे वास्तव मांडले.

सीमाप्रश्‍नावर नामी उपाय सांगत नव्या पिढीने लढण्यासाठी पारंपरिक मार्गाऐवजी शिक्षणाची कास धरावी. त्याचबरोबर राजकीय क्षितिजाचा परिघ विस्तारण्याचा प्रयत्न करावा, असे सूचविले. यातूनच प्रश्‍न मोठा होत जाऊन प्रश्‍नावर उपाय सापडेल, असे सांगितले. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी भाषिक बांधव, भाषिक वैविधता यांचे महत्त्व मांडण्याचा प्रयत्न केले. समृद्ध होण्यासाठी अन्य भाषेचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे बजावले. यातून रसिकांना तृप्त होता आले.  व्याख्यानातून छ. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या लढ्यात सहाय्यभूत ठरलेल्या शिलेदारांचा दमदार आढावा सौरभ करडे यांनी घेतला. संमेलनात दोन कविसंमेलने घेण्यात आली. सर्वाधिक कविंना व्यासपीठ देणारे हे संमेलन आहे. कथाकथनातून दीपक गायकवाड यांनी रसिकांची करमणूक केली. 

नव्यांचा समावेश व्हावा
कडोली संमेलन वाटचाल झपाट्याने अर्धशतकाकडे सुरू आहे. यासाठी पहिल्या फळीतले कार्यकर्ते कष्ट करताना दिसतात. संमेलनाची धुरा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांकडे देण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच हा ज्ञानयज्ञ अधिक क्षमतेने बहरल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा रसिक व्यक्‍त करत आहेत.