Mon, Dec 09, 2019 11:00होमपेज › Belgaon › निपाणीत रोडरोमिओंचा उच्छाद

निपाणीत रोडरोमिओंचा उच्छाद

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 10:51PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

निपाणीतील अशोकनगर चौपाटी तसेच इतर ठिकाणी भेळ व्यावसायिकांनी हायजॅक केलेल्या चौपाटीसह महाविद्यालयीन मार्ग, बसस्थानक परिसर आता रोडरोमिओंच्या विळख्यात सापडला आहे. भरधाव वेग, कानाचे पडदे हादरवून सोडणारा गाडीचा आवाज आणि महिला व युवतींची जाताजाता घडणारी  छेडछाडीची कृत्ये असे दृश्य सर्रास झाले आहे.

याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने सक्षम कारवाईसाठी इंटरसेप्टर वाहन कायमचे कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. दिवसभराच्या कामाच्या ताणानंतर सायंकाळी निवांतपणा घेण्यासाठी वयोवृद्ध, महिला, तरुणी आणि तरुण शहरातील विविध ठिकाणांना रोज भेट घेतात. या चौपाटीवर भेळ, पाणीपुरी, पावभाजी, समोसा, आंबोळी आणि आइस्क्रीम आदी मिळत असल्याने  महिला आणि युवतींची तेथे गर्दी होते.

सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत या टापूत मोठी गर्दी असते. युवतींची संख्या मोठी असते. याच गर्दीतून रोडरोमिओंची सर्कस सुसाट होत असते. दुचाकीचा भरधाव वेग, कानाचे पडदे हादरून सोडणारा गाडीचा आवाज अन् महिला व युवतींची छेड काढली जाते. कोठीवाले कॉर्नर ते राणी चन्नम्मा सर्कल मार्गावरील आयडीबीआय बँकेच्या टोकापासून ते चिकोडी रोड, शहराबाहेरील मुरगूड रोड, बागेवाडी कॉलेज रोड  हा मार्ग या रोडरोमिओंनी निवडला आहे. या प्रकाराबाबत आवाज उठविताना कोणीच दिसत नाही. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक मार्ग अवलंबण्याची गरज आहे. पण याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.

कायदा झाला, कारवाई कधी?

यापूर्वी अनेकवेळा कोठीवाले कॉर्नर, अशोकनगरसह मुरगूड रोड, बागेवाडी कॉलेज रोडवर महाविद्यालयीन युवती व युवकांत छेडछाडीवरून वादाच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी तातडीने त्या थोपविल्या. आज अशा घटनांनी उचल खाल्ली आहे. अशी घटना घडते त्यावेळी पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, कारवाई होतच नाही. कॉलेज सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत नवनवीन दुचाक्या युवकांकडून सुसाट हाकल्या जातात. अशा टवाळखोर युवकांवर कोणतीच कारवाई होत नाही. 

इंटरसेप्टर वाहनाची गरज...

शहरात रोडरोमिओंच्या वेगाला आवर बसावा, विनापरवाना वाहन हाकणार्‍यांना जरब बसावी, यासाठी पोलिसांनी इंटरसेप्टर वाहन कार्यरत ठेवले होते. शहरातील वाहतुकीला शिस्त लागली होती. 6 महिन्यांनंतर हे वाहन मनुष्यबळाअभावी प्रशासनाने बेळगावला पाठविले. यामुळे शहरात वाहतुकीचा पुन्हा बोजवारा उडाला आहे.