Mon, Dec 09, 2019 11:36होमपेज › Belgaon › रणांगण : प्रकाश हुक्केरींना आव्हान कोणाचे?

रणांगण : प्रकाश हुक्केरींना आव्हान कोणाचे?

Published On: Feb 18 2019 1:12AM | Last Updated: Feb 17 2019 8:16PM
गोपाळ गावडा

सलग सात वेळा लोकसभेवर निवडून जाणारे बी. शंकरानंद (जे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रीही राहिले) यांचा पराभव करून इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवत रत्नमाला सावनूर यांनी ज्या मतदारसंघाला देशाच्या नकाशावर नेले, तो मतदारसंघ म्हणजे चिकोडी. कर्नाटक राज्यात दहावीच्या निकालात वारंवार अव्वल स्थान पटकावणारा हा चिकोडी शैक्षणिक जिल्हा पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही तितकाच अव्वल मानला जातो. त्याचे श्रेय मतदार देतात, ते चिकोडीचे नेतृत्व आमदार म्हणून आणि 2014 पासून खासदार म्हणून करणार्‍या काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांना. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपकडून कोण आव्हान उभे करणार, हा सध्या चर्चिला जाणारा विषय आहे. गेल्या वेळी पराभूत झालेले माजी खासदार रमेश कत्तीच त्यांच्याशी भिडण्याची शक्यता जास्त आहे.

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची अवस्था बिकट होणार याचा अंदाज निवडणुकीआधीच बर्‍यापैकी होता. त्यामुळे जिकडे शक्य तिकडे काँग्रेसने सक्षम उमेदवार उभे केले. म्हणूनच, प्रकाश हुक्केरी आमदार आणि साखरमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात समाधानी असताना काँग्रेसने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध लोकसभेला उतरवले होते. 

याच विकासकामांच्या जोरावर प्रकाश हुक्केरी पुन्हा एकदा लोकसभेला उतरतील, हे नक्‍की आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपकडून तूर्त तरी रमेश कत्तींचे नाव पुढे येत आहे. सहकार नेते आणि आ. शशिकला जोल्ले यांचे पती अण्णासाहेब जोल्ले हे आणखी एक नाव चर्चेत आहे. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनीही स्वतःसाठी किंवा पुत्र अमित कोरे यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारीची मनीषा बाळगली आहे.

उमदेवारी या चौघांपैकीच एकट्याला मिळेल; पण लढत कडवी आहे. कारण, चिकोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये चार मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत, तर चार भाजपकडे. म्हणजे विधानसभेचा विचार करता बळ समसमान. इथेच उमेदवाराचा वैयक्‍तिक करिष्मा कामी येणार आहे. 

गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तसेच कर्नाटकात काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाची युती झालेली नव्हती. यंदा ती होणार आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा निकाल पाहता सुमारे लाखभर मतांची बेरीज काँग्रेसकडे येऊ शकते. त्या दोन पक्षांच्या उमेदवारांनी मिळून गेल्या निवडणुकीत जवळपास 82 हजार मते मिळवली होती.(राष्ट्रवादीकडून प्रतापराव पाटील 42 हजार, निजदकडून श्रीमंत पाटील 39 हजार).
यंदा मतदारांची संख्याही सुमारे सव्वा लाखाने वाढली आहे. हा नवमतदार कुणाला मत देतो, हाही घटक निर्णायक ठरू शकतो. 

थोडक्यात, गेल्या वेळचे अत्यल्प मताधिक्य, युतीमुळे वाढणार्‍या मतांना नवमतदारांचे आव्हान आणि सक्षम उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपला तसा उमेदवार मिळालाच, तर चिकोडीची निवडणूक पुन्हा तुल्यबळ होऊ शकते. यंदाही काँग्रेसला कर्नाटकाकडून जास्त आशा आहेत. गेल्या वेळीही कर्नाटकाने राज्य म्हणून सर्वाधिक 9 खासदार काँग्रेसला दिले होते. यंदा हा आकडा दुप्पट करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. त्या हिशेबात चिकोडीही आहे. म्हणूनच प्रकाश हुक्केरींच्या करिष्म्याचा पुन्हा कस लागणार आहे.