Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › पाऊस आला रे...

पाऊस आला रे...

Published On: Jun 29 2019 1:12AM | Last Updated: Jun 29 2019 1:12AM
बेळगाव : प्रतिनिधी

येणार, येणार म्हणून जूनअखेरपर्यंत न आलेला पाऊस अखेर शुक्रवारी दाखल झाला. सध्या तो बेळगाव शहर आणि पश्‍चिम भागापुरता मर्यादित आहे; पण काही काळातच तो जिल्हा व्यापेल, असा अंदाज आहे. शुक्रवारी पावसाने शहर परिसरात दिवसभर हजेरी लावली. यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. आर्द्रा नक्षत्राच्या मध्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळपासून हजेरी लावली. शुक्रवारी पाऊस वाढला. 

जूनच्या दुसर्‍या आठवड्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाठ फिरविल्याामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. शुक्रवारी सकाळच्या सत्रात पावसाला जोर होता. दुपारी पावसाने काही तास विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे विद्यार्थी आणि बाजारासाठी शहरात आलेल्या नागरिकांना कसरत करावी लागली. छत्र्या, रेनकोट यांचा आधार घ्यावा लागला. वर्दीवाल्या रिक्षांचा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पावसाचा सामना करत घर  गाठावे लागले.

रताळी लागवडीला वेग

तालुक्याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करण्यात येते. पावसाने पाठ फिरवल्याने रताळी लागवड रेंगाळली होती. शुक्रवारपासून रताळी लागवड जोमाने सुरू केली आहे. 
शिवारात पुन्हा धांदल भाताची धूळवाफ पेरणीची कामे आटोपली असली तरी पावसाची अपेक्षा करण्यात येत होती. अन्य पिकांच्या पेरण्या रेंगाळल्या होत्या. शुक्रवारपासून पावसाला सुरूवात झाल्याने हंगाम साधण्यासाठी शवारातून धांदल उडाल्याचे दिसून आली. 

शेतकरी सुखावला

पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी रेंगाळलेली पेरणीची कामे जोर धरणार आहेत. यंदा  मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता; मात्र पश्‍चिम भागात पावसाने गुरुवारपासून हजेरी लावली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. त्यानंतर मात्र उघडीप होती. सायंकाळच्या सत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचे आगमन झाले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.