Sun, Dec 15, 2019 05:55होमपेज › Belgaon › बेळगावात पाकधार्जिण्या घोषणा

बेळगावात पाकधार्जिण्या घोषणा

Published On: Mar 04 2019 1:05AM | Last Updated: Mar 03 2019 11:14PM
बेळगाव : प्रतिनिधी

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना काही जणांकडून पाकिस्तानचा जयजयकार सुरूच आहे. असाच आगाऊपणा रविवारी दुपारी कामत गल्लीत चार तरुणांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्यापैकी दोघांना चांगलेच बदडून काढले, तर दोघे युवक पळून गेले. दरम्यान, या परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. मार खाल्लेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी  एकटा गंभीर जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना मारहाण करणार्‍या अनोळखींविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आयुब बशीर मुल्ला (19, रा. कलईगार गल्ली) व महंमदसहेफ आयुब पटेल (22, रा. वीरभद्रनगर) अशी  अटक केलेल्यांची नावे आहेत.  यापैकी महंमदसहेफवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी दुपारी दुपारी 3.30 च्या सुमारास चार तरुण कामत गल्लीत आले. या गल्लीत पाकिस्तानचा निषेध करणारा आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करणारा मोठा फलक लावण्यात आला आहे. त्या फलकाजवळ आधी ‘त्या’ चार तरुणांनी फटाके फोडले, त्यानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा सुरू केल्या. 

अचानक सुरू झालेल्या घोषणाणाबाजीमुळे तत्काळ आजूबाजुचे व्यापारी आणि काही तरुणांनी या घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याबरोबर घोषणा देणार्‍या चौघांनी पळ काढला. पण जमावाने त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले.  ‘भारतात राहून पाकचा जयजयकार करण्याचा देशद्रोह का करता’, असे विचारत जमावाने त्या दोघांना चोपले.  त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. तेथे दोरीने बांधून त्यांना पुन्हा बदडले. तोपर्यंत ही घटनेचे वृत्त शहरात पसरल्याने गल्लीत जमाव जमला होता. 

पोलिसांकडे सुपूर्द 

घटनेची माहिती मार्केट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी तरुणांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यानंतर वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, एपीएमसीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्चि, माळमारुतीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सिव्हीलला भेट दिली. महंमदसहेफच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर आयुबला किरकोळ जखमी आहे. त्याला  पोलिसांनी अटक करून मार्केट पोलिस ठाण्यात नेले आहे. 

जिल्ह्यातील चौथी घटना 

16 फेब्रुवारी रोजी झुलेका ममदापूर (शिवापूर, ता. सौंदत्ती) या शिक्षिकेने सोशल मिडियावर पाकिस्तानचा जयजयकार करण्याबरोबरच आपले स्टेट्स ठेवल्याने तिचे घर पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. 23 फेब्रुवारी रोजी रामदूर्ग तालुक्यातील कटकोळ येथे एकमेकांशी चॅट करताना आक्षेपार्ह मजकूर  टाकणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. 2 मार्च रोजी रामदूर्ग येथील महंमदशफी बेन्नी या काँग्रेस कार्यकर्त्याने सोशल मिडियावर पाकिस्तानचा जयजयकार केल्याचा निंद्य प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर रविवारी बेळगावात असाच लांच्छनास्पद प्रकार घडला आहे.

दोन स्वतंत्र गुन्हे

पाकचा जयजयकार करणार्‍या या दोघांसह फरारी संशयित तरुणांविरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सापडलेल्या दोघांना मारहाण केल्याने काही अनोळखी तरुणांविरोधातही मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.