Fri, Sep 20, 2019 22:01होमपेज › Belgaon › केवळ बँकेला घाबरवण्यासाठीच केला फोन 

केवळ बँकेला घाबरवण्यासाठीच केला फोन 

Published On: Jan 21 2019 1:07PM | Last Updated: Jan 21 2019 2:14PM
चिकोडी : प्रतिनिधी 

केवळ स्टेट बँकेच्या कर्मचार्‍यांना व शहरातील नागरिकांना घाबरविण्यासाठीच आपल्या  मित्राच्या  फोनवरुन  बाँब ठेवल्याचा फोन केल्याची कबूली दोघा संशयितांनी दिली. चिकोडीतील स्टेट बँकेत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने शहरात सोमवारी दिवसभर चर्चा झाली. परंतु, पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. 

सिध्दगौडा यलगौडा पाटील (वय 31, रा.केरुर) व अब्दुल रजाक सय्यद ((वय 45, रा.हालट्टी ता. चिकोडी असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

सोमवारी सकाळी 10:30 च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने चिकोडीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये बाँब ठेवल्याचा निनावी फोन  पोलिस खात्याच्या 100 या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर फोन केला. यानंतर सदर माहिती  बेंगळूर व बेळगांव येथील पोलिस खात्याकडून चिकोडी एएसपी मिथुनकुमार यांना दिली. यानंतर निपाणी सीपीआय संतोष सत्यनाईक व पीएसआय संगमेश होसमनी हे पोलिसांसह घटनास्थळी  दाखल झाले. 

बँकांमध्ये एकच गोंधळ

नेहमी ग्राहकांनी गर्दी असलेल्या  शहरातील सोमवार पेठेतील एसबीआयची मुख्य शाखा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एडीबी शाखा व बुध्द नगरातील बँक ऑफ म्हैसूर या तिन्ही शाखांमधील ग्राहकांना व कर्मचार्‍यांना बाहेर पाठविण्यात आले. यानतंर सुमारे 4 तासाहून अधिक काळ कसून तपासणी करण्यात आली. आचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे तालुक्यातून आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. 

पथकांना पाचारण 

घटनास्थळी दुपारी 1 च्या सुमारास बेळगांव येथील श्‍वान पथक व बाँब शोधक पथक दखल झाले. या पथकाकडून मुख्य शाखेतील प्रत्येक विभागात बाँब शोध कार्य घेण्यात आले पण हाती काही लागले नाही.  सकाळपासून बाँबच्या अफवेमुळे बाँबचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी  करत असल्याने बँकेतील कर्मचार्‍यांना बाहेर पाठविण्यात आले होते. पण, दुपारी 3 नंतर शोध कार्य संपून अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर व्यवहार झाले.

पोलिसांनी तातडीने तपासकार्य हाती घेतले. यावेळी कॉल लोकशन व कॉल ट्रॅक करुन काही तांसातच दोघा आरोपींना ताब्यात घेतले. यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सिध्दगौडा पाटील याने स्टेट  बँकेतील कर्मचार्‍यांना व शहरातील नागरीकांना घाबरविण्यासाठी आपण आपला मित्र अब्दुल सय्यद याच्या मोबाईलवरुन 100 क्रमांकावर कॉल केल्याची खोटी अफवा पसरविल्याचे मान्य केले आहे. 

सदर घटनेची नोंद चिकोडी पोलिस स्थानकात असून पुढील तपास सीपीआय बसवराज मुकर्तीहाळ, पीएसआय संगमेश होसमनी करीत आहेत.