Thu, Dec 05, 2019 21:22होमपेज › Belgaon › ऑपरेशन कमळ तूर्त केले स्थगित

ऑपरेशन कमळ तूर्त केले स्थगित

Published On: Apr 26 2019 1:50AM | Last Updated: Apr 26 2019 12:17AM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक निकाल लागेपर्यंत कर्नाटकात कोणत्याही प्रकारे ऑपरेशन कमळ राबवू नये; अन्यथा राष्ट्रीय पातळीवर भाजपला सत्तेचा मोह असल्याची प्रतिमा निर्माण होईल, असे प्रदेश भाजप नेत्यांना कळवण्यात आले आहे. 

गुरुवारी प्रदेश भाजपची कोअर कमिटी बैठक झाली. यावेळी कोणत्याही आमदाराने काँग्रेस आणि निजदमधील नेत्यांशी संपर्क साधू नये असे सुनावण्यात आले. लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कोणत्याही प्रकारे ऑपरेशन कमळ राबवू नये, अशी कडक सूचना भाजप वरिष्ठांनी कर्नाटक प्रदेश भाजपला दिली आहे.

दरम्यान, माजी मंत्री आणि नाराज काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी  आपल्यासोबत आणखी काही काँग्रेस आमदारांना ओढावयाचा प्रयत्न करत आहेत. याचा सुगावा लागलेल्या प्रदेश काँग्रेस समितीने गुरुवारी दिवसभर खलबते केली. 

आपल्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देतील, असे जाहीर विधान रमेश यांनी केले. त्यामुळे ते आता इतर नाराज आमदारांना गळ घालत आहेत. केवळ एकट्याने राजीनामा दिला तर सरकारला काहीच फरक पडणार नाही. दहा ते पंधरा आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडले तर आघाडी सरकार कोसळेल, असा हिशेब रमेश यांनी घातला आहे.

रमेश यांनी राजीनाम्याबाबत जाहीरपणे वक्‍तव्य केल्याने काँग्रेस-निजद आघाडीत तगमग वाढली आहे. यामुळे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक पक्ष कार्यालयात झाली. मंत्री शिवकुमार यांनी रमेश यांचे निकटवर्तीय श्रीमंत पाटील यांना आपल्या निवासात बोलावून काही माहिती जाणून घेतली. किरकोळ कारणामुळे दुखावून पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये, अन्यथा भविष्यात त्यांना इतर पक्षात अडचणीला सामोरे जावे लागेल, असा सल्‍ला देण्यात आला. डी. के. शिवकुमार यांचा बेळगावातील राजकारणात हस्तक्षेप, आ. लक्ष्मी हेब्बाळकरांवर   नियंत्रण ठेवणे, अशा विविध मागण्यांसाठी रमेश नाराज आहेत. आगामी काळात कोणत्याही चुका असतील तर त्या सुधारण्याबाबत सल्‍लामसलत करण्यात आली आहे.

आ. कुमठळ्ळी संपर्काबाहेर

आ. महेश कुमठळ्ळी गेल्या काही महिन्यांपासून रमेश यांच्यासमवेत असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले. पण, गुरुवारी रमेश अज्ञातस्थळी गेल्यानंतर आ. कुमठळ्ळीही संपर्काबाहेर आहेत.

रमेश यांच्याकडे सरकार कोसळण्याइतके संख्याबळ नाही. महेश कुमठळ्ळी यांच्याबाबत माहिती नाही. रमेश यांचे मेहुणे हंबीर पाटील यांना गडहिंग्लज (महाराष्ट्र) येथून उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते भाजपप्रवेश करत आहेत. उर्वरित 9 जणांबाबतची कारणे आपल्याला माहीत नाहीत.
- सतीश जारकीहोळी,पालकमंत्री, बेळगाव

रमेश हे काँग्रेस नेते आहेत. त्यांच्या शरीरात काँग्रेसचे रक्‍त वाहत आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत. पक्ष सोडला तर त्यांना इतर पक्षात त्रास सहन करावा लागेल.
- दिनेश गुंडुराव, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस