Sat, Dec 14, 2019 06:18होमपेज › Belgaon › कार अपघातात युवक ठार 

कार अपघातात युवक ठार 

Published On: Jun 23 2019 1:13AM | Last Updated: Jun 23 2019 1:13AM
बेळगाव : प्रतिनिधी  

गोव्याहून बेळगावकडे येत असताना कणकुंबीजवळ बेटणे क्रॉस येथे कारला झालेल्या अपघातात बंगळूरचा युवक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अजय बी.एन. (वय 36 रा. मल्लेश्‍वर लेआऊट बंगळूर) असे मृताचे नाव आहे. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. वेंकटेश मुनीराजू (वय 38 रा.बंगळूर), चिरंजिवी (वय 35 रा.बंगळूर), दीपक श्रीनिवास (वय 35 रा.बंगळूर) अशी जखमींची नावे आहेत. 

गोव्याहून बेळगावकडे कारने येत असताना कणकुंबीपासून जवळच असणार्‍या बेटणे गावाजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला असणार्‍या नाल्याच्या संरक्षण कठड्याला जोरदार धडकून खड्ड्यात कोसळल्याने अजयचा मृत्यू झाला. कारमधील इतर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना बेळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती समजताच जखमींना उपचारासाठी लागलीच 108 रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अजयचा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. इतर तीन जखमींना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अजयचा सहा महिन्यापूर्वीच विवाह

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय व त्यांचे मित्र कुमठा (जि.कारवार) येथे  लग्‍न  सोहळ्यासाठी गेले होते. विवाह समारंभ संपवून  तेथून ते गोव्याला गेले होते. गोवा फिरून बेळगावमार्गे बंगळूरला परत जाणार होते. मात्र अपघातात अजय याचा मृत्यू झाला. अजयचा सहा महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. अपघाताबाबत समजताच खानापूर पोलिसांनी धाव घेऊन बचाव कार्य राबविले आहे. घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे.