होमपेज › Belgaon › कार्यालये दोन,पण पहिल्या दिवशी अर्ज शून्य

कार्यालये दोन,पण पहिल्या दिवशी अर्ज शून्य

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 17 2018 11:07PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे बिगुल खर्‍या अर्थाने मंगळवारपासून वाजले असून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती कार्यालयातून देण्यात येत आहे. मात्र पहिल्या दिवशी बेळगाव ग्रामीण, दक्षिण व उत्तरमधून एकही अर्ज दाखल झाला नाही.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढविणार्‍या इच्छूक उमेदवारांना तहसीलदार कार्यालयात अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. दक्षिण व उत्तर मतदार संघातील इच्छूक उमेदवारांचे अर्ज महापालिकेत निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे. अर्ज स्वीकारण्याची तयारी सोमवारपासून अधिकारीवर्गाने केली होती. मंगळवारी किमान पाच ते सहा अर्ज दाखल होतील अशी शक्यता होती. मात्र एकही अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही. 

इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येऊन सुध्दा आपल्या पक्षाचा उमेदवार कोण, यावर शिक्कामोर्बत न झाल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवार फिरकले नाहीत.पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अर्ज भरण्याच्या कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर समर्थकांना थांबविण्याची तरतूद केली आहे. इच्छूक उमेदवारांसोबत केवळ पाच जणांना अर्ज भरण्याच्या कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. 

बी फॉर्म भरताना उमेदवाराने स्वत:ची स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. त्याच्या नावासह पूर्ण पत्ता नमूद करावयास हवा. अर्जासोबत नमुना क्रं. 26 मधून 20 रुपयाच्या बाँडपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. अर्ज भरताना खाडाखोड करु नये. कागदपत्रांच्या दोन स्वतंत्र झेरॉक्स द्याव्यात. अर्जासोबत मोबाईल नंबरबरोबर फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, ईमेल खाते, वैयक्तिक अ‍ॅप, वैयक्तिक वेबसाईट, यु ट्यूब चॅनेल आदी माहिती अर्जासोबत पुरविली पाहिजेत.

या सर्व बाबी तपासून अर्ज स्वीकारला जाईल. अर्ज दाखल करणार्‍या उमेदवाराचे वय 25 पेक्षा कमी असू नये. राष्ट्रीय पक्षातर्फे अर्ज भरत असल्यास एक सूचक पुरेसा आहे. मात्र अपक्ष असल्यास 10 सूचक आवश्यक आहेत. उमेदवाराने आपल्या मतदार संघात  मतदार यादीत नाव असलेली यादी देणे बंधनकारक आहे.

हा नियम  सूचकालाही लागू आहे. सामान्य उमेदवाराला 10 हजार तर अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारला 5 हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे.  निवडणुकीत उमेदवारला 28 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. सर्व आर्थिक व्यवहार उमेदवाराने स्वत:चे नवीन खाते चालू करुन त्यातूनच करायला हवेत. गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Tags : office two ,applications only two belgaon news


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex