Sun, Dec 15, 2019 03:13होमपेज › Belgaon › मान्सूनमुळे जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य खुलले : पंधरा पर्यटन केंद्रांवर गर्दी, विशेष बसची सोय

मान्सूनमुळे जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य खुलले : पंधरा पर्यटन केंद्रांवर गर्दी, विशेष बसची सोय

Published On: Jul 10 2019 1:38AM | Last Updated: Jul 09 2019 8:53PM
बेळगाव, गोकाक : अंजर अथणीकर / सुमीत जी.

गेल्या पंधरवड्यात कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या प्रवाहीत झाल्या आहेत. यामुळे गोकाकचा धबधबा, गोडचिनमलकीचा धबधबा आणि घटप्रभाजवळील धुपदाळ धरण ओसंडून वाहत आहेत. पावसाच्या पाण्याने निसगर्गसौंदर्य खुलले असून पर्यटकांना साद घालत आहे. तीर्थक्षेत्रासह निसर्गाच्या कुशीत असलेल्या सुमारे पंधरा पर्यटन केंद्रांमध्ये पर्यटकांकडून गर्दी होत आहे. या सर्वच ठिकाणी आता यात्रेकरु निवास बांधण्यात येत असून, याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 

गोकाक धबधबा, गोडचिनमलकी धबधबा, सुमारे तीनशे मीटर असणारे ब्रिटीश कालीन धुपदाळ धरण, सोगल येथे जंगलात असलेले सोमनाथ मंदिर, मलप्रभा धरण आदी पंधरा स्थळे निश्‍चित पर्यटन खात्याने निश्‍चित केली आहेत. सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे या पर्यटन स्थळांचे सौंदर्य खुलले आहे.

या सर्व पर्यटन केंद्रांवर कर्नाटकबरोबरच महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील पर्यटक हजेरी लावतात. विदेशी पर्यटकही आता भेट देऊ लागले आहेत. त्यांच्या सोयीसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. पर्यटन केंद्रांपासून विशेष वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.सर्व केंद्रांवर यात्रेकरु निवास बांधण्यात येत आहेत. यासाठी काही ठिकाणी जमिनींचे संपादन झाले आहे. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी फलके लावण्यात येत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

मार्कंडेय नदीवर असलेला गोडचिनमलकी (ता. गोकाक) धबधबा गेल्या चार, पाच वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. येथे अद्याप रस्ता नाही, निवासाची सोय नाही. पर्यटकांना सुमारे 3 कि. मी. चालत जावे लागते. अद्याप हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही झालेला नाही. यावरील धरण भरण्यास अद्याप तीन ते चार दिवस लागतील. त्यानंतर हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे. 

चार दिवसांपासून हिरण्यकेशीचे पाणी घटप्रभा नदीत आल्याने गोकाकचा धबधबा आता पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. त्याचबरोबर घटप्रभापासून 4 कि. मी. अंतरावर असलेले ब्रिटीशकालीन धुपदाळ धरणही आता ओसंडून वाहत आहे. सुमारे तीनशे मीटर रुंद असणारे हे धरण पर्यटकांना तासन्तास खिळवून ठेवत आहे. रेल्वेतूनही याचे दर्शन होते. 

येथे जायचे, राहायचे कुठे?

जिल्ह्यातील पंधराही ठिकाणी बेळगाव व संबंधित तालुक्यात बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. गोकाक तालुक्यातील धबधबे पाहण्यासाठी बेळगावमधून गोकाक फॉल्स, रोडसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत.