Sun, Dec 15, 2019 03:41होमपेज › Belgaon › ‘त्या’ खुनाचा छडा

‘त्या’ खुनाचा छडा

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 17 2019 2:08AM
बेळगाव : प्रतिनिधी 

संतिबस्तवाड येथील रिअल इस्टेट एजंट व माजी ग्रा.पं. सदस्य नागाप्पा भीमसेन जिद्दीमनी (वय 50,  रा नाईक गल्ली, संतिबस्तवाड, ता. बेळगाव) यांचा 6 लाखांची सुपारी देऊन झाल्याचे उघडकीस आले आहे. 

जानेवारीत विश्‍वनाथ बिरमुत्ती नामक तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. यातील संशयितांना  नागाप्पा यांनी मदत केल्याचा संशय मृत बिरमुत्ती याच्या आईला होता. तिने नातेवाईकांना सुपारी देऊन नागाप्पांचा खून करवून आणल्याचे पत्रक पोलिसांनी प्रसिद्धीस दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून, या खुनाची सुपारी देणारी महिला मात्र फरारी आहे.

श्रीधर सत्याप्पा तळवार (35), महांतेश सत्याप्पा तळवार (24), अर्जुन कल्लाप्पा अनेन्नवर (24), श्रीकांत राजू धारवाड (23, सर्वजण रा. रुक्मिणीनगर, बेळगाव), राम शट्ट्याप्पा राठोड (20, वंटमुरी कॉलनी), अभिजीत प्रभाकर कंग्राळकर (49, एससी मोटर्स, मारुतीनगर, बेळगाव), राहुल सुरेश तोटगी (22, महांतेशनगर), परशुराम लक्ष्मण बिरमुत्ती (38, संतीबस्तवाड), शिवाजी संगाप्पा जांबोटी (44, तिर्थकुंडये, ता. खानापूर), परशुराम लक्ष्मण रामगोंडन्नवर (28, रुक्मिणीनगर), किशोर ऊर्फ दर्शन राजू धारवाड (25, रुक्मिणीनगर) व सतीश बोराप्पा तळवार (23, रुक्मिणीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यामधील पहिले दहा संशयितांचा प्रत्यक्ष खुनात सहभाग असून, उर्वरित चौघांनी त्यांना माहिती असूनही त्यांनी ती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. 

28 जानेवारीला संतीबस्तवाड येथील शेतवडीत विश्‍वनाथ बिरमुत्ती या तरुणाचा खून केला होता. तो खून करणार्‍या संशयितांना नागाप्पाने मदत केल्याचा संशय विश्‍वनाथच्या आईला होता. विश्‍वनाथच्या खुनातील संशयितांना नागाप्पाने शरण येण्यास तसेच नंतर जामीन मिळण्यास मदत केली, असाही संशय होता. त्यामुळे तिने दूरच्या नात्यातील शिवाजी जांबोटी व परशराम बिरमुत्ती यांना सोबत घेतले. यानंतर तिने आपल्या ओळखीच्या व नात्यातील रुक्मिणीनगर येथील श्रीधर सत्याप्पा तळवार याला बोलावून घेऊन त्याला नागाप्पाच्या खुनासाठी 6 लाखाची सुपारी दिली. यापैकी 2 लाख रूपये अ‍ॅडव्हान्स दिला, तर उर्वरित रक्कम काम फत्ते झाल्यानंतर देण्याचे ठरले. 

वाहनातच आवळला गळा

30 मे रोजी रात्री पावणे सातच्या सुमारास नागाप्पाला आपल्याला  प्लॉट हवा आहे, यासंदर्भात भेटायचे असून, लवकर व्हीटीयु क्रॉसकडे या, असे सांगत बोलावून घेतले. आधीच झालेल्या कटानुसार खुन्यांनी होंडा जाझ या कार (केए-22 एमए-2716) घेऊन व्हीटीयुजवळ दबा धरून बसले होते. नागाप्पा कारजवळ येताच त्यांना जबरदस्तीने वाहनात कोंबले. यानंतर त्यांचा वाहनातच गळा आवळला. बैलूर क्रॉसजवळ नेऊन डोकीत बॅट व रॉडने वार करून ते मृत झाल्याची खात्री करून निघून गेले. यानंतर उरेलेल्या रक्कमेपैकी 3 लाख रूपये घेऊन ते परागंदा झाले होते. संबंधितांवर खानापूर तालुक्यातील जांबोटी औटपोलिस ठाण्यात खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 

पोलिस प्रमुखांचा पाठपुरावा

जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेल्या महिनाभरापासून त्यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळत रविवारी  अपवाद वगळता या खुनातील सर्व संशयित सापडले. बैलहोंगलचे उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, खानापूरचे निरीक्षक मोतीलाल पवार, उपनिरीक्षक निंगनगौडा पाटील, प्रवीण गंगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला. पोलिस स्टाफ जगदीश काद्रोळी, शिवकुमार तुरमुंदी, जयराम हम्मण्णवर, विठ्ठल चिप्पलकट्टी, सतीश मांग, जगदीश हुबळ्ळी,, आय. एम. नन्नेखान, शिवकुमार बळ्ळारी, एम. एम. मुल्ला, सिद्धू मोकाशी, सुरेश हुंबी, सिद्राम पुजार, महबूब  दादामलिक, रवी बन्नूर, नितीन गावकर, शांतीनाथ पाटील, एफ. आय. सन्नप्पनवर, मानसिंग आर. कडकभावी, व्ही. एल. कळ्ळीमनी, एस. आर. गिरीयाल यांनी परिश्रम घेतले.