Mon, Dec 09, 2019 11:01होमपेज › Belgaon › मनपा आरक्षण अंतिम सुनावणी आज

मनपा आरक्षण अंतिम सुनावणी आज

Published On: Jun 28 2019 1:32AM | Last Updated: Jun 28 2019 1:32AM
बेळगाव : प्रतिनिधी

महापालिका वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवार दि. 28 रोजी धारवाड उच्च न्यायालयात  अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 

9 मार्चपासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सहा महिन्यांच्या आत नियमाप्रमाणे निवडणुका होणे गरजेचे आहे. त्यामुळे या महिन्यात निकाल जाहीर होऊन निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यासाठी मनपाकडून निवडणुकीची तयारी लोकसभा निवडणूकीपूर्वीच झालेली आहे.  बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाविरोधात माजी नगरसेवक अ‍ॅड. धनराज गवळींसह नऊ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा निवडणूका लागल्याने महापालिका निवडणूक तूर्तास थांबविण्यात आली होती.  

वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाला नागरिकांबरोबर आजी-माजी नगरसेवकांनीदेखील आक्षेप घेतला आहे. ज्या वॉर्डात बहुसंख्येने ज्या समाजाचे लोक राहतात. त्यांना डावलून सामान्य, इतर मागासवर्गीय अ व ब, अनुसूचित जाती-जमातीमधील उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवक व माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला असून न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.