होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी कोंडी फोडण्यासाठी आंदोलन

सीमाप्रश्‍नी कोंडी फोडण्यासाठी आंदोलन

Published On: Nov 27 2018 1:21AM | Last Updated: Nov 26 2018 11:15PMबेळगाव : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे मराठी जनतेत मरगळ आली आहे. ती झटकून टाकण्यासाठी मुंबईत 29 रोजी उपोषण आंदोलन होणार आहे. सीमाप्रश्‍नाची निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न होणार आहे. कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने 10 रोजी महामेळावा आयोजित केला आहे. दोन्ही कार्यक्रमामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केले.

शहापूर विभाग म. ए. समितीच्यावतीने गाडेमार्ग येथील श्रीराम मंदिरात सोमवारी सायंकाळी बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून जाधव बोलत होते. माजी उपमहापौर संजय शिंदे, स्थायी समिती अध्यक्षा सुधा भातकांडे, नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, माजी महापौर महेश नाईक, विजय भोसले आदि उपस्थित होते.

जाधव म्हणाले, युवा समितीने पुकारलेल्या उपोषण आंदोलनामुळे सीमावासियांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सीमाबांधवांच्या वेगवेगळ्या मागण्या यामाध्यमातून मांडण्यात येणार आहेत. सीमाप्रश्‍नाला चालना मिळावी यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये सीमाबांधवांनी सहभागी व्हावे.

महामेळावा

मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात महामेळावा जाहीर केला आहे. यामाध्यमातून मराठी माणसांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट केली जाणार आहे. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मराठी जनतेने प्रयत्न करावेत. युवा समितीचे सचिव श्रीकांत कदम म्हणाले, सीमाप्रश्‍न न्यायालयात आहे. या काळात महाराष्ट्राने अधिक ताकदीने प्रश्‍नाचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. चार वर्षापासून उच्चाधिकार समितीची बैठक झालेली नाही. सीमाबांधवातर्फे आठ मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. 
रणजित हावळण्णाचे म्हणाले, सीमाप्रश्‍नाला चालना देण्यासाठी युवा समितीने उचलले पाऊल योग्य असून मराठी युवकांनी यामध्ये अधिक संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर महामेळावा यशस्वी करण्यासाठी येत्या काळात प्रत्येकांने प्रयत्न करावेत.ज्ञानेश्‍वर मण्णूरकर, नगरसेविका सुधा भातकांडे, महेश नाईक यांनी पाठिंबा व्यक्त केला. बैठकीला सतीश गावडोजी, राजू पाटील, सुधीर कालकुंद्रीकर, बापू जाधव, राजकुमार बोकडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने राममंदिरसारखीच भूमिका घ्यावी

राममंदिर प्रश्‍नावरून शिवसेनेने रान उठविले आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेने सीमाप्रश्‍नी भूमिका घ्यावी, उद्धव ठाकरे यांनी    पहिल्यांदा सीमाप्रश्‍न सोडवण्यास सताधार्‍यांना भाग पाडावे, असे आवाहन नेताजी जाधव यांनी केले.

28 रोजी होणार रवाना

मुंबई आंदोलनासाठी कार्यकर्ते 28 रोजी रवाना होणार आहे.  काही कार्यकर्ते रेल्वेने मुंबई गाठणार आहेत. तर बहुतांश कार्यकर्ते वाहनांनी आंदोलनस्थळी पोहोचणार असल्याची माहिती श्रीकांत कदम यांनी दिली.