Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › Belgaon › सीमाभागात आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा

सीमाभागात आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा

Published On: Jun 29 2019 1:12AM | Last Updated: Jun 29 2019 1:12AM
बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता हे आरक्षण सीमाभागातील 865 गावांनाही लागू करावे, या मागणीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी काही दिवसांत व्यापक बैठक घेऊन मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि. 29 रोजी जत्तीमठ येथे बैठक झाली. सकल मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी बेळगावातही मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. सीमाप्रश्‍नाशिवाय हा मोर्चा व्हावा, अशी मागणी काही लोक करत होते. पण, त्यांना डावलून आम्ही सीमाप्रश्‍नाच्या मागणीसह प्रचंड प्रमाणात मोर्चा काढला. त्याचे कौतुक झाले. आता महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ सीमाभागातील 865 गावांना व्हावा, यासाठी आमची जबाबदारी वाढली आहे. सीमाभागात आरक्षण लागू करण्याबाबत याआधीही आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आगामी काळात व्यापक बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मुंबई येथे मंत्रालय किंवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढून आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येईल, असे मरगाळे यांनी सांगितले.

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही बेळगावात मोर्चा काढला. त्याची दखल घेत मुंबईच्या मोर्चात सीमाप्रश्‍नाची मागणी करण्यात आली. आता आरक्षण वैध ठरल्यामुळे या आरक्षणाचा सीमावासियांनाही लाभ होणे आवश्यक आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाला व्यापक बैठक घेणे आवश्यक असून त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात यावी.

अ‍ॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. बेळगावातूनही आरक्षणाच्या आंदोलनात वारंवार सहभाग घेण्यात आला आहे. त्यामुळे याजी जाणीव करून देण्यासाठी आणि आमचा हक्‍क मिळवण्यासाठी सर्वांनी महाराष्ट्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

माजी महापौर मालोजी अष्टेकर, गुणवंत पाटील, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, सूरज कणबरकर, प्रकाश पाटील, ईश्‍वर लगाडे यांनीही मनोगत व्यक्‍त करताना महाराष्ट्राप्रमाणे सीमाभागातील मराठा समाजाला आरक्षण लागू होण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्‍त केली.

शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. राजू मरवे यांनी आभार मानले. एल. डी. बेळगावकर, पांडुरंग पट्टण, महादेव मंगणाकर, विकास कलघटगी, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळक, सचिव श्रीकांत कदम, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, विनायक मोरे, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात होणार सत्कार

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरात सत्कार होणार आहे. येत्या आठवडाभरात हा कार्यक्रम होणार असून त्यावेळी सीमाभागातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी केले आहे. त्यानुसार तारिख जाहीर झाल्यानंतर मोठ्या संख्येने कोल्हापुरातील सत्काराला उपस्थित राहण्याचा निर्धार बैठकीत झाला.