Mon, Sep 16, 2019 05:55होमपेज › Belgaon › खानापुरात मेगाब्लॉक!

खानापुरात मेगाब्लॉक!

Published On: Feb 25 2019 12:58AM | Last Updated: Feb 25 2019 12:58AM
खानापूर : प्रतिनिधी

चोहो दिशेने लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, नियोजनाअभावी उडालेला रहदारीचा बोर्‍या आणि वाहनांच्या गराड्यात कित्येक तास अडकून पडलेले प्रवासी अशा प्रचंड गैरसोयींमुळे ‘हॅपी संडे’ साजरा करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठी ‘बोअरिंग संडे’ ठरला. ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी रविवारच्या सुट्टीची संधी साधून मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले अन् सकाळी 11 वाजल्यापासूनच खानापूरकडे येणार्‍या सर्व मार्गांवर मेगाब्लॉकची स्थिती निर्माण झाली. दिवसभरात 10 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने शहरात पाऊल ठेवायलाही जागा शिल्लक उरली नाही. लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त दर्शन व पाहुण्यांच्या घरी भेट देण्यासाठी शहरात रोजच दीड ते दोन लाख भाविक दाखल होत आहेत. 

कोल्हापूर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, गोवा या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असलेले खानापूरकर सहकुटुंब शहरात दाखल होऊ लागले. त्याशिवाय बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने भाविक खानापूरकडे येऊ लागले. सकाळी 10 पासून सुरू झालेल्या गर्दीत तासाभरात झपाट्याने वाढ होऊन 11 च्या सुमारास खानापूर ते गणेबैलपर्यंतच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागून चक्काजाम झाला.

बघताबघता 12 वा. पर्यत देसुर क्रॉसपर्यंत वाहने खोळंबून राहिली.  शहरातील जांबोटी क्रॉस याठिकाणी चार रस्ते मिळत असल्याने चारही बाजुंनी येणार्‍या वाहनांची एकच कोंडी झाली. या कोंडीचा परिणाम चार की. मी अंतरावर असलेल्या गणेबैलपर्यंत जाणवत होता. केवळ बेळगाव-खानापूर महामार्गच नव्हे तर जांबोटी-खानापूर, पारिश्‍वाड-खानापूर, गर्लगुंजी-खानापूर, रामनगर-खानापूर, नंदगड-खानापूर या सर्वच मार्गांवर कित्येक कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

खानापूर शहर व येथील रस्त्यांना ठराविक लोकसंख्या व वाहनांची मर्यादा आहे.  आज अनपेक्षितपणे तब्बल 10 ते 11 लाखाचा जनसमुदाय व दिड ते दोन लाख वाहने शहरात दाखल झाल्याने गर्दीने रस्त्यांच्या मर्यादेचेही बांध फुटले.  प्रचंड संख्येने दाखल झालेल्या वाहतुकीला सुरळीत करताना पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागली. रात्री 12 वा. पर्यंत रस्ते गर्दीने दुथडी कायम भरले होते.

अपुरे पोलीसबळ अन् हताश प्रवासी

वास्तविकपणे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने देवीच्या दर्शनासाठी दोन ते तीन लाख भाविक दिवसभरात हजेरी लावतील असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र दिवसभरातगर्दीचा महापूर उसळल्याने सर्वच नियोजन कोलमडले. वाहनांची रीघ लागल्याने यात्रास्थळपासून 3 ते 4 कि. मी अंतरावर वाहने पार्किंग करुन चालत दर्शनाला जावे लागले. सर्वच चौकांत वाहतूक कोंडी होऊन रहदारीचा फज्जा उडाल्याने पोलीसांची संख्याही अपुरी पडली. ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था बघून अखेरीस शहरातील काही तरुण मदतीला धावले. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी पोलीसांना वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले.