Thu, Dec 05, 2019 20:45होमपेज › Belgaon › विराट मोर्चासाठी २१ रोजी बैठक

विराट मोर्चासाठी २१ रोजी बैठक

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 17 2019 12:04AM
बेळगाव : प्रतिनिधी

मराठी फलक लावण्याबाबत आणि मराठीतून कागदपत्रे देण्याबाबत आडमुठी भुमिका घेणार्‍या जिल्हा प्रशासनाविरोधात विराट मोर्चा काढण्यासाठी 21 जुलै मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये विराट मोर्चावर शिक्कामोर्तब होणार असून शहर, बेळगाव, खानापूर तालुक्याच्यावतीने मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.

शहरातील दुकानांवर कन्नड फलकांची सक्ती आणि मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणार्‍या जिल्हा प्रशासनाला सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जाब विचारला होता. पण, जिल्हाधिकार्‍यांनी मराठीतून कागदपत्रे देण्याबाबत सरकारने कोणताही आदेश बजावलेला नाही. उच्च न्यायालयात आदेश झाला असला तरी, मला सरकारी आदेश आवश्यक आहे, असे सांगत उडवा-उडवीची उत्तरे दिली होती. त्यामुळे संतापलेल्या समितीने जिल्हाधिकार्‍यांविरोधात विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट मोर्चाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहर, बेळगाव आणि खानापूर तालुका घटक समित्यांची बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासनाला धडकी बसेल, अशा पध्दतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

सीमाभागात कन्नडलाच प्राधान्य असणार आहे. कन्नडमध्ये फलक नसल्यास कारवाई करू, अशी धमकीही जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे याविरोधात आता समिती रस्त्यावर उतरणार आहे.