Fri, Aug 23, 2019 16:41होमपेज › Belgaon › बेळगाव तालुक्यातील मराठी नावेही लागली खुपू

बेळगाव तालुक्यातील मराठी नावेही लागली खुपू

Published On: Dec 20 2018 1:22AM | Last Updated: Dec 19 2018 11:14PM
बेळगाव : प्रतिनिधी

बंगळूर ग्रामीणमधील रहिवासी असणार्‍या विधान परिषद सदस्या डॉ. तेजस्विनी गौडा यांनी बुधवारी सभागृहात शून्य काळात बेळगावातील गावांच्या कानडीकरणाचा प्रश्‍न मांडला. त्यांना तत्काळ उत्तर मिळाले नाही तरी बेळगावातील मराठीपणाचा पोटशूळ मात्र प्रखरपणे जाणवला.

डॉ. तेजस्विनी यांनी काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव बदलून बेळगावी केल्याची आठवण करून दिली. मात्र अजूनही बेळगावात गाव आणि ग्राम या नावाने काही नावे आहेत. याबाबत महसूल खात्याकडून कोणते पाऊल उचलण्यात येणार आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला.  महसूल मंत्री सभागृहात उपलब्ध नसल्याने ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी संबंधित मंत्र्यांकडून यावर उत्तर मागविले जाईल, असे आश्‍वासन दिले.

सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असताना केंद्रातील भाजप सरकारने 17 ऑक्टोबर 2014 रोजी बेळगावचे बेळगावी असे नामकरण केले. बेळगावसह 11 शहरांची नावे बदलण्यात आली. 2006 मध्ये याबाबतचा प्रस्ताव तत्कालिन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने याबाबतच्या हालचाली केल्या. तत्कालिन केंद्रीय मंत्री सदानंदगौडा आणि अनंतकुमार यांनी यासाठी आपला प्रभाव पाडला. 

भाषावार प्रांतरचनेनंतर 865 मराठी गावे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून या गावातील रहिवाशांनी सीमालढा उभारला. महाराष्ट्र सरकारने हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. त्याबाबत सुनावणी सुरू असतानाही बेळगावाचे बेळगावी करण्यात आल्याने सीमावासीयांत संतापाची लाट उसळली. आता डॉ. तेजस्विनी गौडा यांनी गावांच्या नावांचे कानडीकरण करण्याचा प्रश्‍न उपस्थित केला आहे.