Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › पावणं, तुमच्या गावात वातावरण काय?

पावणं, तुमच्या गावात वातावरण काय?

Published On: Apr 14 2019 12:38AM | Last Updated: Apr 14 2019 12:38AM
प्रतिनिधी

गावातील पानटपरीवर, किराणा दुकानात, पारावर, मंदिरात, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी सध्या निवडणुकीचा  ज्वर दिसत आहे. रस्त्यावरून येता-जाता ओळखीची व्यक्ती दिसली की राजकीय विषयालाच हात घातला   जात आहे. पावणं, तुमच्या गावात वातावरण कुणाचं? असा प्रश्‍न केला की पुढे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या जोर घेतला आहे. मतदानाला शेवटचे नउ दिवस उरल्याने  कार्यकर्ते व उमेदवार गावे पिंजून काढत असताना गावागावात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. दोन, चार नागरिक एकत्र बसले की राजकारणावरच गप्पा झडत आहेत. आपल्या गावात, भागात अमूक उमेदवाराला गतवेळी किती मतदान झाले, यावेळी किती मते पडणार, याचा कयास बांधला जात आहे.

बेळगाव मतदारसंघात भाजप विरुध्द काँग्रेस-निजद युती असा मुकाबला होणार आहे. लढत दुरंगी होत असली तरी या मतदारसंघात विक्रमी 57 उमेदवार रिंगणात असल्याने म. ए. समितीच्या 45 शिलेदारांकडेही लक्ष आहे. 

समितीचे उमेदवार एकूण किती मते घेणार, याची उत्सुकता आहे. मराठी भाषिक गावात समितीचे उमेदवार कोण कोण आहेत, यासह सर्वाधिक मतदान कोण घेणार, याचेही तर्क वर्तविले जात आहेत. मतांची विभागणी झाल्यास कुणाला लाभ होणार आणि कुणाला फटका बसणार, याचेही वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.

ग्रामीण भागात बसस्थानक किंवा बसमधून प्रवास करताना दोन व्यक्ती एकमेकांच्या गावातील राजकीय कौल आजमावून पाहत आहेत. कोण पुढारी कोणत्या पक्षात गेला, कुणाला काय गिफ्ट मिळाले, याचीही रंगतदार चर्चा होत आहे.

 बँका, सोसायटयामध्ये गेलेले नागरिक ओळखीच्या भेटलेल्या व्यक्तीला त्यांच्या गावातील राजकीय वातावरणाची माहिती घेत आहेत. कोणी प्रचारात आघाडी घेतलीय, कुणाचे नियोजन चुकले अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे चर्चेतून शोधली जात आहेत. एकंदरीत मतदान जसे जवळ येत आहे, तशी राजकीय चचार्र् तापत आहे.