होमपेज › Belgaon › आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 20 पासून 

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 20 पासून 

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:09PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन दि. 20 पासून येथील मंडोळी रस्त्यावरील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर 4 दिवस आयोजन करण्यात आले आहे. 23 तारखेपयंर्ंत चालणार्‍या या महोत्सवात विविध सांंस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच युवकांसाठी उमंग, मुलांसाठी बलून फेस्ट तसेच डीजे -शो चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे माजी आ. अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळचा हा 8 वा पतंग महोत्सव असून याचे उद्घाटन खा. अंगडी व अन्य मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. लंडन, अमेरिका, इटली,  ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स, न्यूझीलंड, कॅनडा, तुर्कस्तान, स्वीत्झर्लंड आदी देशांमधून 22 आंतरराष्ट्रीय पतंगपटू सहभागी होणार आहेत. याचप्रमाणे भारतातून विविध राज्यातील 17 आंतरराष्ट्रीय पतंगपटू सहभागी होणार आहेत. 

यावर्षीही गोवा येथे 16 आणि 17 तारखेला गोवा सरकारच्या सहकार्यातून पतंग महोत्सव होणार असून पहिल्यांदाच धारवाड येथे येत्या 19 तारखेला भुमरेड्डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर खा. प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत पतंग महोत्सव होणार आहे. 

युवावर्गासाठी उमंग हा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला असून दि. 21 जानेवारी रोजी  ग्रुपडान्स, सोलो गायन, फॅशन-शो, ढोल-ताशा आदींचे आयोजन करण्यात आले असून 1200 हून अधिक महाविद्यालयीन युवक सहभागी होणार आहेत. यामध्ये हुबळी, धारवाड, कारवार, मंगळूर, विजापूर, गोवा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणच्या 42 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.
बलून फेस्टिव्हलमध्ये दि. 22 जानेवारी रोजी 11 शाळांमधील 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दि. 23 जानेवारी रोजी क्रॅकर-शो आणि पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पत्रकार परिषदेवेळी चैतन्य कुलकर्णी, गणेश मळलीकर व अन्य उपस्थित होते.