Sat, Sep 21, 2019 06:41होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

Published On: Nov 21 2018 1:07AM | Last Updated: Nov 21 2018 1:07AMबंगळूर : प्रतिनिधी

मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळांवर नेमणुकीचा गुंता अद्याप सुटलेलानाही. सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत चारवेळा या ना त्या कारणांनी विस्तार लांबणीवर टाकण्यात आला होता. आता बेळगावातील अधिवेशन झाल्यानंतर विस्तार करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. 

निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी सोमवारी युती सरकार समन्वय समिती अध्यक्ष सिद्धरामय्या यांची कुमारकृपा अतिथीगृहामध्ये भेट  घेऊन चर्चा केली. सद्यस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतल्यास  काय होईल, यावर साधकबाधक चर्चा केल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळावर नेमणूक करण्यात आल्यास बेळगावात होणार्‍या अधिवेशन काळात काँग्रेस आणि निजद या दोन्ही पक्षांवर टीकेची झोड उठणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवू इच्छिणारे आमदार समर्थकांच्या मदतीने अधिवेशन काळात आंदोलन करतील. सध्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले आहे. हाच मुद्दा पकडून सरकारविरुद्ध आपलेच आमदार उलटतील. यासाठी अधिवेशनानंतरच विस्तार करणे सरकारला हिताचे होईल, असा सबुरीचा सल्ला देवेगौडांनी सिद्धरामय्यांना दिल्याचे समजते.

मकर संक्रांतीनंतरच मुहूर्त 

बेळगावात 10 ते 20 डिसेंबरपर्यंंत  हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीनंतर विस्तार करण्यात येईल. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवू इच्छिणार्‍यांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.