Tue, Sep 17, 2019 04:15होमपेज › Belgaon › ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानीला ब्रेक

ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानीला ब्रेक

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 12:49AM
बेळगाव : प्रतिनिधी

परवा पहाटे मी आलो, रिक्षा चालकाने चक्क दीड किलोमीटरसाठी 250 रुपये मागितले. इतके का? विचारल्यानंतर बसायचे असेल तर बसा, हे त्याचे उत्तर... हा माझा अनुभव. सर्वच बेळगावकरांचा ऑटोचालकांबाबतचा अनुभव फारच वाईट आहे, तक्रारीही वाढत आहेत. यामुळेच सोमवारपासून ऑटोरिक्षा तपासणी मोहीम तीव्र केल्याचे पोलिस अधिकार्‍याने सांगितले. वाहतूक पोलिस व आरटीओच्या संयुक्त कारवाईत सुमारे 70 हून अधिक रिक्षा पकडल्या.  

बहुतांशी बेळगावकरांचे रिक्षाचालकांबाबत सकारात्मक मत नाही. रात्रीच्यावेळी येणार्‍या प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे सांगून लूट करणे, शहरातून फिरताना वाट्टेल तशा रिक्षा घुसडत वाहतूक कोंडी करणे, ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच दम देणे, असे प्रकार सातत्याने घडत असतात. पोलिसांकडून कारवाई झाली तरी तात्पुरती सुधारणा होते. परंतु, काही दिवसांत पुन्हा येरे माझ्या मागल्य... सुरू होते. 

निवडणुकीत व्यस्त असलेले  वाहतूक पोलिस खाते आता मोकळे झाले आहे. त्यांनी रिक्षांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त पोलिसांना फारसा अधिकार नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सोमवारच्या कारवाईत आरटीओच्या निरीक्षकांनाही सामावून घेतले. ज्या रिक्षा चालकांकडे योग्य कागदपत्रे नाहीत, ज्यांनी परमीट नूतनीकरण केलेले नाही, रिक्षा चालविण्याचा परवाना नाही अशा रिक्षांवर दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परमीट रद्द करण्याचा विचार आरटीओ व वाहतूक पोलिसांनी चालविला आहे. त्यामुळेच सोमवारची मोहीम ही संयुक्तरित्या राबविल्याचे सांगण्यात आले. 

70 वर ऑटोरिक्षा जप्त 

ज्या ऑटोरिक्षा चालकांकडे वाहनांची कागदपत्रे नाहीत, अशा 70 हून अधिक ऑटोरिक्षा जप्त केल्याची माहिती वाहतूक दक्षिणचे पोलिस निरीक्षक गोपाळ राठोड यांनी दिली. चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, आरटीओ सर्कलसह शहरातील विविध चौकांत दिवसभर ही कारवाई सुरू होती. गोपाळ राठोड, वाहतूक उत्तरचे निरीक्षक एम. एस. पाटील, आरटीओ निरीक्षक महेश मठपती, एस. डी. बेल्लद यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex