Sun, Dec 15, 2019 05:58होमपेज › Belgaon › खानापूर तालुक्यात 19 हजार मतदार वाढले

खानापूर तालुक्यात 19 हजार मतदार वाढले

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 10:52PMखानापूर : वासुदेव चौगुले

तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच सुरुवात झाली असून प्रशासनाने मतदारयाद्या, मतदान केंद्रे यांच्या सज्जतेसह सर्व यंत्रणा तयार ठेवण्यासाठी लगबग चालविली आहे. गत विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 85 हजार 386 मतदार मतदानासाठी पात्र होते.

 यावेळी मतदारराजाच्या संख्येत 19 हजार 450 ची वाढ झाली असून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी 2 लाख 3 हजार 378 मतदार भावी लोकप्रतिनिधीचे भवितव्य ठरविणार आहेत.
2013 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यात 72. 76 टक्के मतदान झाले होते. त्यासाठी 227 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने मतदार जागृती कार्यक्रमांबरोबर दुर्गम भागातील जनतेच्या सोयीसाठी मतदान केंद्रांच्या संख्येतही वाढ केली आहे.

आगामी निवडणुकीसाठी तालुक्यात 21 मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली असून एकूण 247 मतदान केंद्रांवर निवडणुकीच्यादृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरु आहे. गत निवडणुकीत 96 हजार 463 पुरूष मतदारांपैकी 71 हजार 396 तर 87 हजार 458 महिला मतदारांपैकी 63 हजार 43 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. तसेच सरकारी सेवेतील 1 हजार 458 मतदारांपैकी केवळ 457 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.

2013 च्या निवडणुकीतील विजेते उमेदवार अरविंद पाटील यांना 37 हजार 55  मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार रफीक खानापुरी यांना दुसर्‍या क्रमांकाची 20 हजार 903 मते मिळाली होती. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व तालुक्याचे स्थानिकत्व मिळविलेल्या मतदारांनीही आपल्या नावाची नोंद मतदारयादीत केली आहे. वाढलेल्या 19 हजार 450 मतदारांमध्ये 90 टक्के तरुण मतदारांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याने निकालाच्यादृष्टीने हे नवमतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

राजकारणाचा म्हणावा तसा अभ्यास नसल्याकारणाने ही 19 हजारची यंग ब्रिगेड कोणाच्या पारड्यात मत घालणार, त्याची सरशी होणार यात शंका नाही. त्याकरिता तरुणाईला आपल्या बाजूने वळविण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी वेगवेगळ्या पद्धतीने कसरती चालविल्या आहेत.