Fri, Sep 20, 2019 22:22होमपेज › Belgaon › कडोलीत घरांवर जेसीबी

कडोलीत घरांवर जेसीबी

Published On: Mar 09 2019 1:26AM | Last Updated: Mar 09 2019 1:26AM
बेळगाव ः प्रतिनिधी

कडोली येथील पेठ गल्‍लीतील रहिवाशांचा रस्ता रुंदीकरणास होणारा विरोध डावलून शुक्रवारी प्रचंड पोलिस बंदोबस्तात मास्टर प्लॅनअंतर्गत रस्ता रुंदीकरण काम सुरू झाले. 

सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कडोली येथील मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण आणि सुशोभिकरण होणार आहे. रस्ता रुंदीकरण काम शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गातून असंतोष पसरलेला होता. सकाळी 7 वा. डी.एस.पी. के. शिवरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काकतीचे उपनिरीक्षक श्रीशैल कौजलगी, मारीहाळचे सीपीआय विजय सिन्नूर, बागेवाडीचे सीपीआय अंबिगेर, महिला पोलिस ठाण्याच्या श्रीदेवी पाटील, काकती पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. अर्जुन हंचिनमनी, बेळगाव रुरलचे पी. एस. आय. कृष्णरेड्डी, काकती ए.एस.आय. पटवर्धन, राज्य राखीव दलाची तुकडीसह कडोली ग्रा.पं. कार्यालयासमोर हजर होते.

रस्ता रुंदीकरणावेळी कडोलीतून होणारी बस वाहतूक वळवण्यात आली होती. सुमारे दोनशे घरे जमिनदोस्त करण्यात आली तर बारा घरे पाडण्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती मिळाल्याने त्या बारा जणांची घरे न पाडता उर्वरित घरे, सार्वजनिक ठिकाणची बांधकामे चार जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. 

घरे पाडू नयेत, अशी विनवणी महिला करीत होत्या तरीही पोलिसांच्या मदतीने घरे पाडण्यात येत होती. घरे पाडताना अनेक जण बाहेरगावी, शेताकडे गेले होते. त्यांची घरे पाडण्यात आली. पाच मिनिटांचाही वेळ न देता घरे पाडवण्यात असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली होती.