Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › ‘ऑपरेशन कमळ’चे बिंग फोडले डोक्यात

‘ऑपरेशन कमळ’चे बिंग फोडले डोक्यात

Published On: Jan 21 2019 1:29AM | Last Updated: Jan 20 2019 11:51PM
बंगळूर : प्रतिनिधी 

ऑपरेशन कमळमुळे नाराज आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले नसले, तरी त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला आहे. भाजपच्या ऑपरेशन कमळची माहिती मुख्यमंत्र्यांना का कळवली, असा जाब विचारत आ. कंप्ली गणेश यांनी आ. आनंदसिंग यांच्या डोक्यात बाटली फोडली. परिणामी आनंदसिंग जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याच्या जखमेवर 12 टाके घालावे लागले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तथापि, काँग्रेसने बाटलीहल्ल्याचा इन्कार केला असून, आनंदसिंग छातीदुखीमुळे रुग्णालयात भरती झाले आहेत, असे म्हटले आहे.

हल्ला करणारे आ. गणेश हे कंप्लीचे आणि जखमी आनंदसिंग होसपेटचे आमदार आहेत. दोघेही बळ्ळारी जिल्ह्यातीलच असून, शनिवारी सायंकाळी बळ्ळारीचे पालकमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बळ्ळारीतील काँग्रेस आमदारांची स्वतंत्र बैठक विधानसभेत घेऊन बळ्ळारीचा विकास आणि दुष्काळावर चर्चा केली. त्यानंतर या दोघांसह सारे काँग्रेस आमदार आ. हॅरिस यांच्या नातलगाच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. रात्री ते ईगलटन रिसॉर्टमध्ये परतले. तेथेही काँग्रेस आमदारांची पुन्हा बैठक झाली.     

बैठकीनंतर गणेश, आनंदसिंग आणि भीमा नायक एकत्र असताना अचानक ऑपरेशन कमळची माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांना का कळवली, असे आ. गणेश यांनी विचारत आ. आनंदसिंगवर हल्ला केला. हल्ल्यात त्यांनी आनंदसिंग यांच्या डोक्यात बाटली फोडली. त्यामुळे खोक पडले. त्यांना तातडीने जवळच्या शेषाद्रीपुरममधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन करण्यात आले असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र डोक्यात 12 टाके घालावे लागले आहेत. हल्ल्यानंतर आनंदसिंग यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट  पसरली असून, ते सातत्याने शिवकुमार यांच्याकडे विचारणा करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हल्ला नाहीच : खा. सुरेश

आ. आनंदसिंग यांच्यावर कोणीही हल्ला केलेला नाही. त्यांच्या डोक्यात जखम झालेली नाही. प्रसारमाध्यमांमध्ये येणार्‍या बातम्या सांगोसांगी आहेत. आ. सिंग स्वतः रविवारी सकाळी 7 वाजता छातीदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, असा दावा काँग्रेस खा. डी. के. सुरेश यांनी केला. सुरेश यांनी रुग्णालयात जाऊन सिंग यांची भेट घेतल्यानंतर बाहेर येऊन पत्रकारांना ही माहिती दिली. रविवारी सायंकाळी बैठक, लग्नसोहळा, पुन्हा बैठक अशा व्यस्त कार्यक्रमांमुळे दगदग झाली असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची ईसीजी, शुगर आणि बीपी चाचणी करण्यात आली आहे, अशी माहितीही खा. सुरेश यांनी दिली.

भाजपची टीका

काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी होणे ही गुंड संस्कृती आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक यांनी केली आहे. पार्टीनंतर मद्याच्या आहारी जाऊन हा हल्ला केला गेला आहे. हीच काँग्रेसची संस्कृती आहे, अशीही टीका त्यांनी केली.