Thu, Dec 05, 2019 20:48होमपेज › Belgaon › दाम्पत्यासह सून, नातू ठार

दाम्पत्यासह सून, नातू ठार

Published On: Mar 29 2019 1:36AM | Last Updated: Mar 29 2019 12:04AM
खानापूर  : प्रतिनिधी

गोव्यातील नातेवाईकांकडे जाऊन खानापूरमार्गे बंगळूरला परत चाललेल्या कुटुंबीयांच्या कारला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दाम्पत्यासह त्यांची सून व नातू असे चौघे ठार झाले. तर अन्य दोघे जखमी झाले. खानापूर-नंदगड मार्गावरील हेब्बाळनजीकच्या झाडीजवळ गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. दुलेखान डी. एस (वय 55) व चांदबी डी. एस (53) या दाम्पत्यासह सून हजरतबी जहीरअब्बास डी. एस (34) आणि नातू झायदअब्बास डी. एस (6, सर्वजण रा. बंगळूर) अशी अपघातात ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. तर हजरतबीचा पती जहीरअब्बास डी. एस (38), आणि जुनेदअहमद डी. एस (9) अशी जखमींची नावे आहेत.

बंगळूर येथील जहीरअब्बास व त्यांचे कुटुंबीय गोव्यातील नातेवाईकांकडे जाऊन गुरुवारी दुपारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. चोर्ला-खानापूरमार्गे राष्ट्रीय महामार्ग गाठण्याचा त्यांचा बेत होता. सायंकाळी सातच्या सुमारास हेब्बाळनजीकच्या झाडीजवळ त्यांची इंडिका व्हिस्टा कार आली असता, खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर आडवी झाली. त्याच वेळी नंदगडहून खानापूरच्या दिशेने येणार्‍या ट्रकची जोरदार धडक बसल्याने कारमधील चौघांचा चिरडून मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत कारचा चालक बाहेर जाऊन पडला. तसेच दोघेजण गाडीतच अडकून पडले.

इतर प्रवाशांनी तातडीने नंदगड पोलिस व रुग्ण वाहिकेला पाचारण केले. कार ट्रकमध्ये अडकल्याने जखमींना बाहेर काढताना बरीच कसरत करावी लागली. पाऊण तासानंतर रुग्णवाहिका दाखल झाली.
गंभीर जखमी झालेल्या चांदबी व त्यांचा नातू जुनेदअहमद यांना बेळगाव सिव्हील इस्पितळात दाखल करण्यात आले. कारमधील जहीरअब्बास हा एकमेव जखमी शुद्धीत आढळला. मात्र,घटनास्थळावरची विदारक परिस्थिती पाहून तोही हबकून गेला होता.

अपघातानंतर दोन्ही वाहनांमुळे रस्ता ब्लॉक झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पो. नि. मोतीलाल पवार, उपनिरीक्षक सुमा नायक यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कुटुंबाचे हावेरी येथे नातलग आहेत. त्याठिकाणी आजची रात्र वस्ती करुन उद्या सकाळी बंगळूरपर्यंतचा पुढचा प्रवास ते करणार होते.