Mon, Aug 19, 2019 03:20होमपेज › Belgaon › ३३ लाखांच्या बनावट नोटा बंगळूरमध्ये जप्‍त

३३ लाखांच्या बनावट नोटा बंगळूरमध्ये जप्‍त

Published On: Jul 14 2019 2:22AM | Last Updated: Jul 13 2019 11:47PM
बंगळूर : प्रतिनिधी

बंगळूर येथील सुब्यापाळ्या उपनगरात राहून बनावट चलनी नोटा छापणार्‍या कॅमरून देशाच्या नागरिकाला शनिवारी पोलिसांनी पकडून त्याच्याकडून 33 लाख 22 हजार किमतीच्या दोन हजारांच्या नोटा जप्त केल्या. खदीम क्रिशपुला (वय 35) असे त्याचे नाव आहे. 

खदीम दोन वर्षांपूर्वी पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आला  होता. तो बंगळूरच्या सुव्यान पाळ्या परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. खोलीत तो कलर झेरॉक्स, प्रिंटर आणि संगणकाच्या सहाय्याने बनावट नोटांची छपाई करीत होता. काही एजंटांना हाती धरून तो दोन हजारांची बनावट नोट तीनशे रुपयांना विकत होता. ही माहिती मिळताच बानसवाडी पोलिसांनी शनिवारी त्याच्या घरावर छापा टाकून दोन हजार दर्शनी मूल्याच्या  33 लाख 22 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर आणि कलर झेरॉक्स जप्त केले. 

क्रिशपुला याच्या व्हिसाची मुदत संपूनही तो बेकायदेशीररित्या रहात होता. त्याच्याकडून घेतलेल्या नोटा एजंट बिअर बार, हॉटेल, धाबे आदी ठिकाणी खपवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तो हा व्यवसाय कधीपासून करीत होता याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.