Thu, Dec 12, 2019 22:12होमपेज › Belgaon › रमजान ईदचा शिरखुर्मा महागला

रमजान ईदचा शिरखुर्मा महागला

Published On: May 27 2019 11:55PM | Last Updated: May 27 2019 11:03PM
बेळगाव : प्रतिनिधी

दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. सौंदर्यप्रसाधने, कपड्याबरोबर शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यालाही मागणी वाढली आहे. गतवर्षाच्या तुलनेत सुका  मेव्याच्या दरात जवळपास दहा टक्के वाढ झाली आहे सर्वाधिक वाढ ही पिस्त्याच्या दरात झाली आहे. 

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला 7 मेपासून प्रारंभ  झाला आहे. दहा दिवसांपासून खडेबाजार परिसरातील सर्व गल्ल्या आणि बाजारात विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. 

सायंकाळी उपवास सोडल्यानंतर खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी बाजारात  गर्दी होत आहे. चिकन फिरणी, फळे, सरबतचे साहित्य, खजुरांना अधिक मागणी आहे. इराक, इराण, सौदी अरेबिया आदी देशातील खजूर विक्रीसाठी बाजारात आले आहेत.  त्ंयांच्या किंमती अगदी 50 रुपयांपासून ते दोन हजार रुपये किलोपर्यंत आहेत.

रमजान ईदला मुस्लिम बांधवांकडून शिरखुर्मा करण्यात येतो. यावर्षी त्यासाठी लागणार्‍या सुका  मेव्याच्या दरात जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. काजू, बदाम, बेदाणा, अंजीर यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत.

सर्वाधिक दर पिस्त्याचे वाढले आहेत. 1800 रूपये किलोवर असणार्‍या पिस्त्याचे दर आता 2100 ते 2200 रुपयांपर्यंत गेले आहेत. शेवायाचा दरही प्रति किलो दहा रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती सुका मेवा विक्रते अब्बास मुजावर यांनी दिली.

रमजान ईदच्या खरेदीने भेंडी बाजार, खंजर गल्ली, कोतवाल गल्ली, जालगार गल्ली फुलून जात आहे. आगामी 9 दिवस ही गर्दी अशीच राहणार आहे.