Fri, Jun 05, 2020 01:47होमपेज › Belgaon › व्यापार्‍यांचे अखेर नमते...

व्यापार्‍यांचे अखेर नमते...

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 17 2019 1:45AM
बेळगाव : प्रतिनिधी

‘एपीएमसी’ प्रशासन व किल्ला भाजी मार्केटमधील वाद अखेर संपुष्टात आला आहे. किल्ला भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांनी अखेर नमते घेतले असून ‘एपीएमसी’त येण्यास तयार झाले आहेत. जयकिसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनने एपीएमसीमध्ये येण्यास विरोध केला होता. मात्र, गुरुवारी काही व्यापार्‍यांनी संडे मार्केटमध्ये जागा मिळेल  तेथे भाजीपाला विक्रीचे सौदे सुरू केले होते.

या व्यापार्‍यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, गुरुवारीच एपीएमसीत येण्यास होकार दर्शविला आहे. एपीएमसीतील सलग गाळे देण्याची मागणी किल्ला भाजी मार्केट असोसिएशनने एपीएमसी संचालक मंडळाकडे केली होती. मात्र, एपीएमसीत तसा कायदा नाही. त्यामुळे गाळे लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन व्यापार्‍यांनी गाळे दिले जातील, असे एपीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे. आता या ठिकाणी शिल्लक असलेल्या 30 गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. 

एपीएमसीत पुन्हा नव्याने 32 गाळे उभारणीसाठी दोन कोटी 32 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या गाळ्यांचे भूमिपूजनही झाले आहे. पावसाळ्यानंतर गाळ्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. एपीएमसीत गाळे उभारण्यासाठी 70 कोटींचा आराखडा  आहे. त्यामध्ये पुन्हा नव्याने गाळे तयार करणार आहेत. या ठिकाणी चहा कॅन्टीन, रस्ते, दुचाकी पार्किंग व्यवस्था केली आहे. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नका

गांधीनगर येथील भाजी मार्केट उभारणीस परवाना मिळाला आहे, अशा अफवा काहीजणांकडून बाजारात पसरविल्या जात आहेत. मात्र, त्यावर कोणीही विश्‍वास ठेवू नये. भाजी मार्केट एपीएमसीत कायमस्वरूपी राहणार आहे, असे आवाहन एपीएमसीतर्फे करण्यात आले आहे.  

आज संयुक्त बैठक

किल्ला भाजी मार्केट असोसिएशनने  अध्यक्ष आनंद पाटील, उपाध्यक्ष सुधीर गड्डे, सचिव गुरूप्रसाद एच. के.  व अन्य सदस्यांची गुरुवारी भेट घेऊन आपल्या मागण्या कळविल्या आहेत. व्यापार्‍यांनी पहिल्या टप्प्यात आठ दिवसांची मुदत मागितली होती. पण माघार घेत गुरूवारीच आपला होकार कळविला आहे. एपीएमसी अधिकारी व व्यापार्‍यांची संयुक्त बैठक शुक्रवारी होणार आहे.