Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › अधिकारी- शेतकर्‍यांत पुन्हा वाद

अधिकारी- शेतकर्‍यांत पुन्हा वाद

Published On: May 09 2019 1:50AM | Last Updated: May 09 2019 12:02AM
बेळगाव : प्रतिनिधी

हलगा- मच्छे बायपास रस्त्यासाठी वडगाव आणि शहापूर शिवारातील जागेचा सर्व्हे करण्यास आलेल्या अधिकर्‍यांबरोबर शेतकर्‍यांची वादावादी झाली. नोटिसीमध्ये नसलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांनी याला विरोध केला. यामुळे पुन्हा बुधवारी काम थांबवण्यात आले असून कागदपत्रे घेऊन पुन्हा फेरसर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वडगाव शिवारात हलगा - मच्छे बायापास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रांताधिकारी कविता योगपण्णावर यांनी दिले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास वडगाव, शहापूर शिवारात पोलिस बंदोबस्तात पोहोचले. मात्र, ते येण्यापूर्वीच या परिसरातील सुमारे शंभरहून अधिक शेतकरी, महिला येथे उपस्थित होत्या. 

पोलिसांच्या बंदोबस्तात रस्त्याचे सर्वेक्षण सुरु  असताना शेतकर्‍यांनी याला विरोध करत यापूर्वी नोटीस न दिलेल्या जागेचे सर्वेक्षण सुरु असल्याची तक्रार केली. तुमच्याकडील नोटीस पाठवलेली कागदपत्रे दाखवा मगच पुढील सर्वेक्षण करा, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्याचबरोबर रस्त्याची दिशा बदलण्यात आली असल्याचेही अनेकांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे अधिकार्‍यांनी आपले काम काही वेळेसाठी थांबवले. आता पुन्हा गुरूवारपासून फेरसर्वेक्षणास प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. 

माझी जी जागा जाणार होती त्यापेक्षा अधिक 23 फूट जागा जात आहे, असा आरोप शेतकरी काकतीकर यांनी केला. शंकुतला कणबरकर, गुंडू भागण्णाचे, भैरु कंग्राळकर आदींनीही सर्वेक्षणास अपवाद घेतला. यावेळी यल्‍लाप्पा मोरे, निलम बिरजे, भैरु कंग्राळकर आदी उपस्थित होते.