हुबळी : प्रतिनिधी
आतापर्यंत अनेकदा प्राप्तीकर खात्याच्या अधिकार्यांनी छापे घालून तपास केला. त्यावेळी डोळ्यातून अश्रू ढाळले नाहीत. मग, निवडणुकीत मते मागण्यासाठी डोळ्यात पाणी आणायचे का? असा प्रश्न पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.
येथील कॉटन कौंटी क्लब येथे आयोजित काँग्रेस, निजद नेत्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार, पदाधिकारी उत्साहाने निवडणूक कामात भाग घेत आहेत. त्यामुळे आनंद आहे. मतदारसंघामध्ये ग्राऊंड रिपोर्टही चांगला आहे. निजद आणि काँग्रेसमध्ये सध्या समन्वय असून निवडणुकीवर याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होणार असल्याचे शिवकुमार म्हणाले. मंत्री सी. एस. शिवळ्ळी आपले चांगले मित्र होते. बैठकीवेळी त्यांची आठवण आल्यानंतर अचानक डोळ्यातून पाणी आले. त्यांनी केलेली कामे यापुढेही सुरु राहतील. याआधी सी. एस. शिवळ्ळी यांच्या सूचनेनुसार काही कामे केली होती. आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करावयाचे असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
काँग्रेस आणि निजदचे 20 आमदार आपल्यासोबत असल्याचे विधान येडियुराप्पा करत आहेत. पण, केवळ 20 नव्हे तर सर्व 222 आमदार त्यांच्यसोबत आहेत. ते काँग्रेसच्याही संपर्कात असल्याचा टोमणा शिवकुमार यांनी मारला.