Sat, Dec 14, 2019 06:13होमपेज › Belgaon › बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज सीमाभागात गुन्ह्यांना ऊत

बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज सीमाभागात गुन्ह्यांना ऊत

Published On: May 10 2019 1:59AM | Last Updated: May 10 2019 12:14AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये गुन्ह्यांना ऊत आला असून, तिन्ही तालुक्यांत गुन्हे करणारी टोळी एकच असल्याचा संशय आहे. चार दिवसांपूर्वी एकाच रात्रीत घरफोड्या झाल्याने चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे सिद्ध झाले आहे. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी संयुक्तपणे तपासाची गरज व्यक्त होत आहे. 

चार दिवसांपूर्वी दड्डी परिसर तसेच हुक्केरी तालुक्याच्या सीमेजवळील हडलगे (ता. गडहिंग्लज) येथेही  घरफोड्या करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या दोन्ही घरफोड्या एकाच पद्धतीने झाल्या आहेत. यापूर्वी दड्डी परिसरातील शट्टीहळ्ळीसह चंदगड हद्दीतील मरणहोळ, किणी, नागरदळे, करेकुंडी, बुकीहाळ, कौलगे  येथे एकाच रात्री लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. निपाणी व कागल तालुक्याच्या सीमेवरील काही गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. 

काही दिवसापूर्वी कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील एकाच चोरट्याने कोवाड परिसरात तब्बल 16 घरफोड्या करून धुमाकूळ घातला होता. त्याला नेसरी पोलिसांनी जेरबंद केले. यानंतर या परिसरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

दोन्ही जिल्ह्यात घरफोड्या एकाच पद्धतीने गेल्या सहा महिन्यांत बेळगाव, हुक्केरी, निपाणी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात होणार्‍या घरफोड्यांंमध्ये परप्रांतीय चोरटे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधील चोर्‍या व घरफोड्यांत  सहभागी असणारे चोरटे बेळगाव येथे आश्रय घेत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पिस्तूल विक्रीचे बेळगाव कनेक्शन

बेळगाव : पंधरवड्यापूर्वी शिकारीची बंदूक जप्त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सुळगा (ता. बेळगाव) येथील एकाला ताब्यात घेतले होते. त्याशिवाय गेल्या पंधरा दिवसांत चंदगड तालुक्यातील 7 जणांना ताब्यात घेऊन 6 पिस्तुले कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली. यामध्ये बेळगावचे थेट कनेक्शन असल्याचा कोल्हापूर पोलिसांना संशय आहे.

सीमाभागात गत दोन महिन्यांपासून राजरोस गावठी पिस्तुलांचा वापर  सुरु आहे. गावठी पिस्तूल बेळगावातून येत असल्याचा संशय आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे विशेष पथक गावठी पिस्तूल विक्रीचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध घेत आहेत. इचलकरंजी येथील मनीश नागोरी हा यापूर्वी गावठी पिस्तुलांची तस्करी करीत होता. मात्र हा आरोपी सध्या तुरुंगवासात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले पुरवठा करणारा कोण आहे, याचा उलगडा झालेला नाही. चंदगड, आजरा येथील अनेक तरुण बेळगाव, मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे गावठी पिस्तुले परराज्यातून व्हाया बेळगाव ते कोल्हापूर असा व्यवसाय सुरु असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. केवळ 20 हजार रुपयांत पिस्तूल मिळत चोरट्या मार्गाने खरेदी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.