Wed, Apr 01, 2020 14:39होमपेज › Belgaon › कर्नाटकात 21 हजार जण स्थानबद्ध

कर्नाटकात 21 हजार जण स्थानबद्ध

Last Updated: Mar 25 2020 10:19PM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने बुधवारी कर्नाटकात आणखी एक बळी घेतला. त्यामुळे कर्नाटकातील मृतांची संख्या दोन झाली आहे. तर आणखी 10 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी निष्पन्‍न झाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 झाली आहे. याशिवाय अनेकांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सुमारे 21 हजार लोकांना घरात तसेच रुग्णालयात स्थानबद्ध (क्‍वारंटाईन) करण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य खात्याने नजर ठेवली आहे. 

बुधवारी चिक्‍कबळ्ळापूर जिल्ह्यातील गौरीबिदनूर गावातील एक 75 वर्षीय वृद्धा कोरोनाचा बळी ठरली. ती मक्केहून काही दिवसांपूर्वी परतली होती. ती मधुमेह आणि हृदयविकाराने पीडित होती. याआधी तिला कोरोना संशयित म्हणून जाहीर करण्यात आले होते.

वृद्धेच्या मृत्यूमुळे कर्नाटकातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे. याआधी गुलबर्ग्याच्या एका वृद्धाचा  बळी गेला होता. कोरोनाच्या फैलावापासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी पूर्णपणे बंद पाळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतेही दुकान सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक ठिकाणी भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण बनले आहे. रोज वारंवार कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पण, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे. फीव्हर क्‍लिनिक सुरू करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. स्थानबद्ध केलेल्यांची या क्‍लिनिकमध्ये प्राथमिक चाचणी केली जाणार आहे. अशा क्‍लिनिकमध्ये 50 टक्के डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचारी सेवा देणार आहेत.

कारवारमध्ये घरासमोर पोस्टर

कारवार जिल्ह्यातील भटकळ येथे दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी घेण्यात आली आहे. विदेशातून आलेल्यांच्या घरासमोर पोस्टर लावण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे याआधीच गोकर्णमध्ये आलेल्या विदेशी नागरिकांची अडचण झाली आहे. होम स्टे, रिसॉर्टमध्येच त्यांचे वास्तव्य आहे. 14 एप्रिलपर्यंत त्यांना कुठेही जाता येणार नाही. आहे त्याच ठिकाणी स्थानबद्ध राहावे लागणार आहे.

तीन ठिकाणी स्वॅब चाचणी

संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी सरकारी प्रयोगशाळांचा अभाव आहे. त्याकरिता देशात एकूण 12 खासगी प्रयोगशाळांना कोरोना व्हायरससंबंधी स्वॅब तपासणीची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. बंगळूरमधील बौरिंग रुग्णालय रोडवरील एनआरएल प्रयोगशाळा, शंकर रिसर्च कॅन्साईट टेक्नॉलॉजी व मणिपालमध्ये कस्तुरबा रुग्णालयात स्वॅब चाचणी होणार आहे.

हासनमध्ये सामाजिक अंतराचे भान

हासन जिल्ह्यात सामाजिक अंतर ठेवण्यात येत आहे. बंदमुळे जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी अनेकजण एकाचवेळी गर्दी करत आहेत. बंदमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. पण, दूध, भाजीपाला, किराणा साहित्य, औषधे अशा ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून 1 मीटर दूरवर चौकोन आखण्यात येत आहेत. दोन व्यक्‍तींमध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवण्याची सूचना पोलिस आणि नगरपालिकेने केली आहे. यासाठी हासन जिल्हा पोलिसप्रमुख श्रीनिवास गौडा यांनी पुढाकार घेतला आहे. किराणा दुकानांसमोर त्यांनी रंगाने चौकोन आखले आहेत. सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलिस घेत आहेत.

मंगळुरात आजपासून पूर्ण बंद

मंगळूर येथे गुरुवारपासून (दि. 26) संपूर्णपणे बंद असणार आहे. बुधवारी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. बंदची काटेकोर अंमलबजावणी केली तरी अत्यावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नवीनकुमार कटील यांनी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मंगळूरमध्ये एकाच दिवसात चौघे कोरोना रुग्ण आढळले आहेत. याचा फैलाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून सर्वांनी घरीच राहणे आवश्यक आहे. मंगळूर जिल्ह्यातील कोरोना संशयितांवर नजर ठेवण्यात आली आहे. केरळ भागातून अनेक रुग्ण मंगळुरात आणण्यात येत आहेत. पण, जिल्हा प्रशासनाने नाकाबंदीचा निर्णय घेतला असून केरळमधील कोणत्याही रुग्णवाहिकेला मंगळूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे कटील म्हणाले.