Sun, Dec 08, 2019 21:48होमपेज › Belgaon › पाण्यासाठी महाराष्ट्राशी करार : शिवकुमार

पाण्यासाठी महाराष्ट्राशी करार : शिवकुमार

Published On: May 07 2019 1:57AM | Last Updated: May 06 2019 11:43PM
बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने कर्नाटकाकडे पाण्याची मागणी केली असून, यासंदर्भात तांत्रिक अधिकार्‍यांकडून समिती नेमून करार करण्यात येईल. त्यानंतर पाण्याची देवाण-घेवाण होईल, अशी माहिती पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

पाटबंधारे खात्याच्या मुख्य कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खा. प्रभाकर कोरे, खा. प्रकाश हुक्केरी आदी उपस्थित होते. शिवकुमार म्हणाले, महाराष्ट्राकडे आम्ही कृष्णा नदीमध्ये चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी मान्य केली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. याआधी आम्ही या पाण्याच्या बदल्यात    त्यांना पाणी बिल देत होतो. यावेळी मात्र त्यांनी बिलाऐवजी पाण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील काही भागाला (सोलापूर जिल्हा) कर्नाटकातून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी कोठून सोडायचे, कोठे सोडायचे, किती सोडायचे याबाबत महाराष्ट्र शासनाबरोबर चर्चा करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रातील राजापूर (जि. सांगली) बंधार्‍यातून चार टीएमसी पाणी सोडल्यास बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. यासाठी आता महाराष्ट्राबरोबर करार करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक अधिकार्‍यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या करारावर मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन महाराष्ट्र शासनाबरोबर करार करण्यात येणार आहे. यामुळे यापुढेही पाण्याची देवाणघेवाण करण्यात येईल.

व्यावसायिक वापर केल्यास फौजदारी

महाराष्ट्रातून मिळणारे हे पाणी केवळ पिण्यासाठी असणार आहे. याचा व्यावसायिक कारणासाठी किंवा शेतीसाठी वापर करता येणार नाही. हे पाणी आल्यानंतर नदीकाठावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा  खंडित करण्यात येणार आहे. याबाबत पाटबंधारे आणि पोलिसांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्‍लंघन करणार्‍यांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, असा इशाराही शिवकुमार यांनी दिला.