Thu, Dec 12, 2019 22:11होमपेज › Belgaon › प्रेमप्रकरणातून सुपारी किलिंग

प्रेमप्रकरणातून सुपारी किलिंग

Published On: Apr 02 2019 1:56AM | Last Updated: Apr 02 2019 12:12AM
निपाणी : प्रतिनिधी

प्रेमविवाहाला विरोध करणार्‍या तरुणाचा दोन लाखांची सुपारी देऊन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी  उघडकीस आला.  या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुपारी किलरनी खून करून मृतदेह खाणीत टाकल्याची कबुली दिली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव अरविंद गौरीशंकर पोळ (वय 39, रा. जत्राटवेस) असे असून, तो श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचा कार्यकर्ता होता.

हल्लेखोरांनी खून करून अरविंदचा मृतदेह नांगनूर हद्दीतील खाणीत चटईमध्ये गुंडाळून टाकला असून, सोमवारी खाणीत शोध घेऊनही मृतदेह हाती लागला नाही, मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती निपाणी पोलिसांनी दिली. सौरभ अथणी (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी), सतीश क्षीरसागर (20, रा. बिरोबा माळ, निपाणी), आणि राजेश कटके (22, रा. जत्राट वेस, निपाणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 
राजेश कटके याचे अरविंद पोळ याच्या नात्यातील एका मुलीवर प्रेम आहे. राजेशने लग्नाची रितसर मागणीही घातली. मात्र, अरविंदने लग्नाला विरोध केल्याने प्रियकर राजेश कटकेने सुुपारी देऊन हा खून घडवून आणला. 

तपासाची फिरली चक्रे

बसवेश्‍वर स्थानकाचे प्रभारी उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला  अधिक माहिती देताना म्हणाले, अरविंद  किराणा दुकान पिठाची गिरणी चालवत होता. रविवारी दुपारी तो घरातून दुचाकीवरून बाहेर पडला. पण रात्री तो घरी परत न आल्याने सोमवारी सकाळी त्याचा भाऊ अजित पोळ याने फिर्याद दिली. लागलीच पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता जत्राट-अकोळ रोडवरील रंगाची दुचाकी पडल्याचे पोलिसांना कळाले.  पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून  खातरजमा केली असात, ती दुचाकी बेपत्ता अरविंदची असल्याचे समजले. गाडीची तपासणी केली असता अरविंदचा मोबाईल सापडला. मोबाईलमधील कॉल यादी तपासल्यानंतर शेवटचा कॉल सौरभ अथणी  या संशयिताचा असल्याचे  स्पष्ट झाले. सौरभसला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अरविंदचा खून  केल्याची कबुली दिली. 

असा झाला खून

राजेश कटके याचे अरविंदच्या नात्यातील युवतीवर प्रेम आहे. प्रेमाचे रूपांतर विवाहात होणार होते. मात्र राजेशने लग्नाची मागणी केल्यावर अरविंदने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या राजेशने अरविंदचा  काटा काढण्याचे ठरवून सौरभला 2 लाखाची सुपारी दिली. सौरभने आपला साथीदार सतीशसह अरविंदला रविवारी दुपारी पांगिरे-ए येथे आपल्या आजीच्या घरी पार्टीचे निमित्त करून बोलावून घेतले. शिवाय आजीला बाळूमामा माळाजवळ सोडून निपाणीला स्वतःच्या  घरी जाण्यास सांगितले.

अरविंद पांगिरे-ए गावात सतीशच्या आजीच्या घरी पोचला. तेथे सौरभने अरविंदच्या डोक्यावर हातोडीने घाव घातला. त्यात अरविंद ठार झाला. रात्री  सौरभ व सतीश यांनी मित्राच्या कारमध्ये मृतदेह ठेवला. सौरभने अरविंदची दुचाकी अकोळ-जत्राट मार्गावर टाकून दिली आणि  अरविंदचा मृतदेह चटईत गुंडाळून नांगनूर हद्दीतील पाण्याने भरलेल्या खणीत टाकला.

सौरभने खुनाची कबुली देताच राजेश कटकेसह दोघांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. त्यानंतर सोमवारी दुपारी 3 पासून संशयितांना ताब्यात घेऊन अरविंदचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक विभागासह अकोळ व परिसरातील पाणबुड्यांची मदत घेतली. मात्र मृतदेह हाती लागला नाही. खाण परिसरात पंचक्रोशीतील लोकांनी  मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन सूचना दिल्या. उपअधीक्षक जी.के.मिथुनकुमार, सीपीआय करूणेशगौडा जे., ग्रामीणचे उपनिरीक्षक बी.एस.तळवार, सहाय्यक उपनिरीक्षक एस.एस.जाधव, हवालदार शेखर असोदे, एम.एम.जंबगी, एस.एम.सनदी, नितीन बडिगेर, एम.ए.तेरदाळ, एस.एस.सूर्यवंशी यांनी तपास केला. अरविंदच्या पश्‍चात आई,वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

मोबाईल कॉलमुळे छडा

प्रेमविवाहातील अडथळा काढण्यासाठी युवतीचा प्रियकर राजेश कटके याने 2 लाखांची सुपारी दिली असे पोलिसांचे म्हणणे आहे.  रविवारी रात्री सौरभ आणि त्याच्या साथीदारांनी अरविंदचा खून करून त्याचा मोबाईल दुचाकीच्या डिकीमध्येच ठेवला होता. या मोबाईलवरील शेवटच्या कॉलच्या आधारे पोलिसांनी छडा लावला.

निपाणी खूनप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश चिकोडीच्या उपअधीक्षकांना दिली आहे. रात्री उशिरापर्यंत या सर्वांची चौकशी सुरू होती. सुपारी देऊन खून केल्याचा संशय आहे. या खुनात आणखी कोणी सहभागी असतील तर त्यांनाही अटक केली जाईल.
एच. सुधीरकुमार रेड्डी, जिल्हा पोलिसप्रमुख