Sun, Dec 08, 2019 21:45होमपेज › Belgaon › काँग्रेसला फटका, २००४ पासून भाजप पर्व

काँग्रेसला फटका, २००४ पासून भाजप पर्व

Published On: Apr 13 2019 1:41AM | Last Updated: Apr 12 2019 11:21PM
शिवाजी शिंदे

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात आणि एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारताच्या राजकारणाने कूस बदलण्यास प्रारंभ केला. स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी काळाच्या ओघात अस्तंगत होत असताना ध्येयवाद, समाजवाद मागे पडत चालला. सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणासाठी सत्ता या नव्या समीकरणावर विश्‍वास असणारी पिढी सर्वच राजकीय पक्षाच्या शिरोभागी आली. बदलत्या राजकारणाने पहिला खिळा काँग्रेसच्या पेटीवर मारला. याचे पडसाद राजकारणात दिसून आले.

याच काळात जागतिकीकरणाची पावले नकळतपणे सामान्यांच्या जीवनात शिरली. प्रत्येक गोष्टीत कडवेपणा, कट्टरतावाद, असहिष्णुता याचा शिरकाव झाला. जुनी जीवनमूल्ये कालबाह्य ठरली. राज्याराज्यात प्रादेशिक पक्ष वाढीला लागले. त्यांनी मतदारांमध्ये उन्माद जन्माला घातला. यात  राजकारण भरडले गेले.

सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाचा परिणाम नकळतपणे जुन्या पक्षांना भोगावा लागला. राममंदिरच्या माध्यमातून भारतीय मतदारांच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश मिळाले. यातून भाजपाची घोडदौड सुरू झाली. याचा प्रत्यय 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्यारुपाने भाजपाने सर्वसमावेशक चेहरा पुढे आणला. त्यांची प्रतिमा मतदारांसमोर ठसठशीतपणे उभे करण्यात आली होती. याचा फायदा बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला झाला. चार दशकापासून ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. 

भाजप उमेदवार सुरेश अंगडी यांनी काँग्रेस उमेदवार बॅ. अमरसिंह पाटील यांचा पराभव करून विजयी झाले. कमळाने पहिल्यांदाच हाताला जोरदार झटका दिला. अंगडी यांना 4 लाख 10 हजार 843 मते मिळाली. काँग्रेसचे अमरसिंह पाटील यांना 3 लाख 26 हजार मतावर समाधान मानावे लागले. जनतादलाचे उमेदवार समील रेझा यांना 66 हजार मते मिळाली.

हा   विजय भाजपसाठी टर्निंग पाईंट ठरला. त्यानंतर झालेल्या 2009 झालेल्या निवडणुकीत अंगडी यांनी पाटील यांचा दारुण पराभव केला. यामुळे पाटील यांच्या राजकारणाला मर्यादा आल्या. त्यानंतर अमरसिंह पाटील यांनी दोन वेळा पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजपमध्येच प्रवेश केला.अंगडी यांना राजकारणाच्या आखाड्यात तारण्यात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वपूर्ण ठरला. भाजपच्या पारड्यात मराठी  पट्यातील मते भरभरून पडली. याचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला.

शहरातील मते निर्णायक 

बेळगाव शहरात निर्माण होणार्‍या जातीय तणावाचा फटका सामान्यांना बसला. परंतु, याचा फायदा राजकीय पक्षांकडून पद्धतशीरपणे घेण्यात आला. यातून मतांचे ध्रुवीकरण वाढत गेले. जाती, धर्माच्या नावाखाली मतदानाला प्राधान्य देण्यात येऊ लागले. याचा फटका काही पक्षांना सहन करावा लागला. याचे प्रत्यंत्तर बेळगावात पाहावयास मिळाले.