Thu, Dec 05, 2019 20:45होमपेज › Belgaon › मोदी-राहुल शाब्दिक चकमक

मोदी-राहुल शाब्दिक चकमक

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:29AMकलबुर्गी /औराद : 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारानिमित्त कर्नाटक दौर्‍यावर आहेत. येथील निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून, बहुतेक पक्षाच्या नेत्यांची पहिली फळी या रणसंग्रामात उतरली आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या झडत असलेल्या फैर्‍यामुळे येथील निवडणुकीकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी कलबुर्गी येथे झालेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांच्यावर आरोप केला. तर औराद येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राहुल गांधी यांनी दुपारी मोदींच्या आरोपाला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील सुरू असलेली शाब्दिक चकमक येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे.

जवानांच्या देशप्रेमाबद्दल काँग्रेसला शंका : नरेंद्र मोदी

आपल्या जवानांनी जे बलिदान दिले, त्याबद्दल काँग्रेसला अजिबात आदर नाही. जेव्हा आपल्या सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा काँग्रेसने जवानांच्या देशप्रेमावर शंका उपस्थित केली होती, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  काँग्रेसवर चढविला. मोदी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटक दौर्‍यावर आहेत. त्यांनी गुरुवारी कलबुर्गी येथील प्रचाराच्या जाहीर सभेत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

मोदी म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक कर्नाटकचे भविष्य निश्‍चित करेल. फक्त आमदारांची निवड करण्यापुरती ही निवडणूक आहे, असे समजू नका. महिला सुरक्षा, शेतकर्‍यांचा विकास हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कर्नाटकला शौर्याची परंपरा आहे; पण फिल्डमार्शल करीअप्पा आणि जनरल थिमय्या यांना काँग्रेसने कशी वागणूक दिली? 1948 साली पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर     तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री कृष्णा मेनन यांनी जनरल थिमय्या यांचा अपमान केला होता, असा दावा मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आपल्या लष्कर प्रमुखांना गुंड म्हणाले होते, असा आरोप मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकसाठी जाताना आपल्या जवानांनी बंदुका नव्हे कॅमेरा घेऊन जावे, असे काँग्रेसला वाटते. ‘वंदे मातरम’वेळी मंचावर राहुल गांधी यांच्याशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कसे वागत होते, त्यावर मोदींनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्‍वासन दिले होते; पण त्यांनी दलित समाजाची दिशाभूल केली, असे मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये कँडल मार्च काढणारी काँग्रेस बिदरमध्ये जेव्हा दलित मुलीचा छळ झाला, तेव्हा तुमच्या कँडल कुठे गेल्या होत्या, असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी केला.

पंतप्रधान म्हणून तुम्हाला ही भाषा शोभत नाही : राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कर्नाटकविषयी बोलण्यासारखे काहीच नाही. जेव्हा ते घाबरतात, तेव्हा ते माझ्यावर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले करतात; पण मी तसे करणार नाही. मोदीजी तुम्ही पंतप्रधान म्हणून या देशाच्या महत्त्वाच्या पदावर आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा शोभा देत नाही, असा पलटवार राहुल यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्जिकल स्ट्राईकवरून केलेल्या टीकेवर राहुल गांधी यांनी औराद येथे गुरुवारी आयोजित काँग्रेसच्या प्रचारसभेत घणाघात केला.

नीरव मोदीपासून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या भ्रष्टाचारापर्यंतच्या अनेक प्रश्‍नांवर मोदी गप्प आहेत. ते केवळ माझ्यावर व्यक्तिगत टीका करत आहेत; पण कर्नाटकबाबत ‘च’कार शब्दही काढत नाहीत. मोदीजी तुमच्या बोलण्यात ‘दम’ आहे, असे लोकांना वाटेल असे बोला. तुम्ही नेमकेपणाने आणि खरी वस्तुस्थिती मांडत आहात, असे सर्वांना वाटले पाहिजे, असा टोला राहुल यांनी मोदींना हाणला.

भारतात कर्नाटकातील काँग्रेस सरकारच सर्वात चांगले असल्याचे स्वत: अमित शहा यांनीही म्हटले आहे, असे सांगतानाच कर्नाटकात येऊन तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता; पण तुम्ही ज्या येडियुराप्पा यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, ते सर्वात भ्रष्ट आहेत, त्याचं काय, असा सवालही यांनी केला.‘शोले’ या चित्रपटात गब्बर होता. तुम्ही गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) आणला. कर्नाटकात तुम्ही संपूर्ण गब्बर गँगसह सांबालाही घेऊन आलात. संपूर्ण रेड्डी गँग निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे आणि तरीही भ्रष्टाचाराच्या गप्पा मारता, असा चिमटाही राहुल यांनी काढला.