Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › कन्नड भाषिक गाव असल्यामुळेच कन्नड बोललो : चंद्रकांत पाटील 

कन्नड भाषिक गाव असल्यामुळेच कन्नड बोललो : चंद्रकांत पाटील 

Published On: Jan 21 2018 7:35PM | Last Updated: Jan 21 2018 7:35PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गाणे म्हटल्याने उठलेल्या वादावर मंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संपूर्ण गाव कन्नड भाषिक असल्यामुळे भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली होती. पण, त्यानंतरचे संपूर्ण भाषण आपण हिंदीतून केल्याचा खुलासा मंत्री पाटील यांनी पुढारी वृत्त समूहाशी बोलताना केला. 

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर 'हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू' या गाण्याचे बोल म्हटल्याने सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळातूनही मंत्री पाटील यांच्यावर टीका सुरू झाली आहे. 

त्यावर मंत्री पाटील म्हणाले, 'यल्‍लाप्पा गाडीवड्डर हा आपल्या घरी लहानपणापासून राहतो. तो आमच्या घरातील मुलासारखाच आहे. यल्‍लाप्पा याच्या तवग (ता. गोकाक, जि. बेळगांव) या गावात दुर्गामातेचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमास मला निमंत्रित केले होते. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. ते संपूर्ण गाव कन्‍नड भाषिक आहे. यामुळे कार्यक्रमात बोलताना कन्‍नड भाषेतून सुरुवात करावी म्हणून व्यासपीठावरील प्रमुखांकडूनच कन्‍नडमधील चार ओळी मराठी शब्दांत लिहून घेतल्या होत्या आणि त्याच वाचल्या. त्यानंतर पुढचे संपूर्ण भाषण हिंदीत केले.' आता कन्‍नड भाषिक नातेवाईकांच्या गावी किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जावयाचे की नाही? असा प्रश्न मंत्री पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संबधित बातम्याः- 

चंद्रकांत पाटील गायले कर्नाटक स्तुती गीत; सीमाभागात संताप (Video)

चंद्रकांतदादांनी सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खूपसला : मुंडे